एसटी बस वाहकाच्या निष्काळजीपणाला चपराक; ग्राहक मंचाचा दणका – तक्रारदारास ५ हजारांची भरपाई
धुळे | प्रतिनिधी
सार्वजनिक वाहतूक सेवेत प्रवाशांशी होणाऱ्या निष्काळजी वर्तनाला चपराक देत धुळे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने शिरपूर एसटी आगारातील बस वाहकाच्या सेवेत त्रुटी असल्याचे स्पष्ट करत तक्रारदारास एकूण ५,००० रुपयांची नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला आहे. या निर्णयामुळे ग्राहकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
बलकुवे, ता. शिरपूर, जि. धुळे येथील माहिती अधिकार कार्यकर्ते माधवराव फुलचंद दोरीक (उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष, माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ, पनवेल) हे दिनांक १७ ऑगस्ट २०२४ रोजी राळेगणसिद्धी येथे होणाऱ्या माहिती अधिकार कायद्याच्या जनजागृती संमेलनासाठी प्रवास करत होते. ते शिरपूर येथून संभाजीनगरकडे जाणाऱ्या एसटी बस (क्रमांक MH-15-JC-8334) मध्ये बसले होते. शिरपूर ते धुळे मध्यवर्ती बसस्थानकासाठी त्यांनी बस वाहक नरेंद्र भास्कर साबळे (बिल्ला क्र. 17130) यांच्याकडून ८० रुपये तिकीट घेतले.
मात्र, मुंबई–आग्रा महामार्गावरील धुळे उड्डाणपूलाजवळ बस आल्यानंतर, सदर बस धुळे मध्यवर्ती बसस्थानकात जाणार नसल्याचे सांगून दोरीक यांना उड्डाणपूलाजवळ उतरवण्यात आले. याबाबत विचारणा केली असता, बस वाहकाकडून कोणतेही समाधानकारक उत्तर देण्यात आले नाही. पूर्वसूचना देणे बंधनकारक असतानाही ती देण्यात न आल्याने तक्रारदारास मानसिक त्रास सहन करावा लागला.
वाद न घालता दोरीक यांनी बसचे GPS लोकेशनचे छायाचित्र घेतले आणि उड्डाणपूलाजवळील गणेश मंदिर परिसरातील बसथांब्यावर थांबले. त्यानंतर एसटी महामंडळाची दुसरी बस आल्याने त्यांनी त्या बसने धुळे मध्यवर्ती बसस्थानक गाठले; मात्र त्यासाठी वेगळे १० रुपये तिकीट काढावे लागले. पहिली बस न गेली असताना दुसरी बस कशी गेली, हा प्रश्न उपस्थित करत त्यांनी या प्रकाराबाबत सखोल तक्रार दाखल केली.
दिनांक २७ ऑगस्ट २०२४ रोजी दोरीक यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी महामंडळ) धुळे येथील विभागीय नियंत्रकांकडे मानसिक त्रासाबद्दल १०,००० रुपयांच्या नुकसानभरपाईची तक्रार दाखल केली. चौकशीत त्या दिवशी धुळे बंदचे आवाहन असल्याचे निदर्शनास आले; तथापि, तरीही प्रवाशांना पूर्वसूचना देणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे बस वाहकास दोषी ठरवत दोन महिन्यांची १० टक्के पगार कपात करण्यात आली.
यानंतरही मानसिक त्रास व अतिरिक्त वेळ व खर्चामुळे नुकसान झाल्याचा दावा करत, दोरीक यांनी दिनांक ६ फेब्रुवारी २०२५ रोजी ग्राहक संरक्षण कायदा २०१९ च्या कलम ३५ अन्वये २०,००० रुपयांच्या नुकसानभरपाईसाठी धुळे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच येथे दावा दाखल केला.
सुमारे १६ महिने स्वतःच्या हक्कासाठी लढा देत, विशेष म्हणजे स्वतःच युक्तिवाद करत, अखेर दिनांक २५ जून २०२६ रोजी ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष यांनी तक्रारदाराच्या बाजूने निकाल दिला. न्यायालयाने सेवेत त्रुटी ठेवल्याबद्दल आणि मानसिक त्रासाबद्दल एकूण ५,००० रुपये (मानसिक त्रास १,०००, सेवेत त्रुटी २,००० व अर्ज खर्च २,०००) ही रक्कम ४५ दिवसांत अदा करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, मुदतीत रक्कम न दिल्यास तक्रार दाखल केल्याच्या दिवसापासून ६ टक्के वार्षिक व्याज देण्याचेही आदेश दिले आहेत.
निकालानंतर माधवराव दोरीक यांनी न्यायालयाचे आभार मानत, “नुकसानभरपाईची रक्कम कमी असली तरी मला समाधान मिळाले आहे,” अशी प्रतिक्रिया दिली. तसेच, “अन्याय सहन न करता नागरिकांनी आपल्या हक्कांसाठी जागरूक राहावे. उशिरा का होईना, पण न्याय नक्की मिळतो,” असे आवाहन त्यांनी जनतेला केले.
— ‘जागो ग्राहक जागो’चा हा निकाल सर्वसामान्य प्रवाशांसाठी दिशादर्शक ठरणार आहे.
