मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण कामाकडे दुर्लक्ष; 70 मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना नोटिसा*

 




 *मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण कामाकडे दुर्लक्ष; 70 मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना नोटिसा* 


शिरपूर, दि. 6 जुलै : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (SIR-2026) अंतर्गत मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम शिरपूर तालुक्यात सुरू आहे. या कार्यक्रमांतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक मतदाराच्या घरी भेट देऊन Enumeration Form (EF) चे वाटप व संकलन करणे अपेक्षित आहे.

सदर काम दि. 30 जून 2026 ते 29 जुलै 2026 या कालावधीत पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहेत. तथापि, शिरपूर तालुक्यातील 70 मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी अद्याप मतदारांना Enumeration Form (EF) चे प्रत्यक्ष अथवा ऑनलाइन वाटप केले नसल्याचे निदर्शनास आले आहे.

भारत निवडणूक आयोगाचा हा कार्यक्रम कालबद्ध स्वरूपाचा असून, संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे प्राथमिकदृष्ट्या आढळून आले आहे. त्यामुळे संबंधित 70 मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1951 मधील तरतुदीनुसार त्यांच्याविरुद्ध कार्यवाही का करण्यात येऊ नये, याबाबत खुलासा मागविण्यासाठी लेखी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम हा लोकशाही प्रक्रियेसाठी अत्यंत महत्त्वाचा असून, सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी विहित मुदतीत जबाबदारीने काम पूर्ण करावे. तसेच मतदारांनीही Enumeration Form (EF) भरून आवश्यक माहिती वेळेत उपलब्ध करून देऊन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


– उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी, शिरपूर विधानसभा मतदारसंघ

– तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, शिरपूर

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने