🕉️ सावळदेच्या तापीघाटावर भक्तीचा महासागर; शिवमहापुराण कथा सोहळ्याची भक्तिमय सांगता
| शिरपूर, प्रतिनिधी
अधिक मासानिमित्त सावळदे येथील श्री तीर्थक्षेत्र तापीघाट महादेव मंदिर येथे आयोजित भव्य शिवमहापुराण कथा सोहळ्याची आज भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात सांगता झाली. गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या या अध्यात्मिक पर्वामुळे संपूर्ण तापीघाट परिसर ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने दुमदुमून गेला होता.
या सोहळ्यात सकाळी ८ ते १० या वेळेत कृष्णकृपा प्रेममूर्ती ह.भ.प. दिलीपजी महाराज (वृंदावन धाम) जळगावकर यांनी शिवमहापुराण कथेमधील शिवतत्त्व, भक्ती, संस्कार व मानवकल्याणाचा सखोल संदेश भाविकांना दिला. त्यांच्या ओजस्वी, रसाळ व अमृतमय वाणीतून झालेल्या अंतिम कथाश्रवणाने हजारो भाविक भावविभोर झाले. कथासमाप्तीनंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाराजांचा सन्मान करण्यात आला.
कथेच्या सांगतेनंतर सकाळी १० वाजेपासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. स्वर्गीय चि. डॉ. अभिषेक दादा राजपूत यांच्या पुण्यस्मरणार्थ आयोजित या महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. महिला, युवक व ग्रामस्थांनी सेवाभावाने महाप्रसाद व्यवस्थेत सहभाग घेतल्याने सामाजिक ऐक्याचे सुंदर दर्शन घडले.
हा संपूर्ण सोहळा समस्त ग्रामस्थ, शिवभक्त महिला मंडळ आणि तापीघाट महादेव मंदिर सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. सात दिवस चाललेल्या शिवमहापुराण कथेमुळे परिसरात धार्मिक जागृती, सामाजिक सलोखा आणि शिवभक्तीची नवी ऊर्जा निर्माण झाल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली. यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे सर्व वर्णांतून कौतुक होत आहे.
