नरडाणा पोलिसांची मोठी कामगिरी: घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, 2.76 लाखांचा मुद्देमाल जप्त

 


नरडाणा पोलिसांची मोठी कामगिरी: घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, 2.76 लाखांचा मुद्देमाल जप्त




📰 सविस्तर बातमी


धुळे | प्रतिनिधी


शिंदखेडा तालुक्यातील डाबली, मेलाणे व नरडाणा परिसरात सातत्याने घडणाऱ्या घरफोडी व मोबाईल चोरीच्या घटनांना अखेर नरडाणा पोलिसांनी आळा घातला आहे. घरफोडी करून चोरी करणाऱ्या टोळीकडून एकूण 2 लाख 76 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात तीन आरोपी व एक विधीसंघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

दि. 6 जून 2026 रोजी रात्री 12 ते 7 जून 2026 रोजी पहाटे 4 वाजेच्या सुमारास, डाबली (ता. शिंदखेडा, जि. धुळे) येथील रहिवासी अरुण मुरलीधर पाटील (वय 43) यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली. लोखंडी कपाट फोडून सुमारे 74 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम, बेंटेक्स पोत व चार्जिंगला लावलेला मोबाईल असा मुद्देमाल चोरून नेण्यात आला होता.

या घटनेप्रकरणी नरडाणा पोलीस ठाण्यात गुन्हा र.नं. 109/2026 अन्वये BNS कलम 331(4), 305 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचा तपास सुरू असताना नरडाणा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी निलेश मोरे यांना गोपनीय माहिती मिळाली. त्या आधारे संशयित

गोरख सुरेश पवार (वय 19),

गोकुळ छगन भिल (वय 20),

बादल राज सोनवणे (वय 18)

(सर्व रा. नरडाणा, ता. शिंदखेडा, जि. धुळे)

आणि एक विधीसंघर्षग्रस्त बालक यांना शिताफीने ताब्यात घेण्यात आले.

सखोल चौकशीत आरोपींनी डाबली, मेलाणे व नरडाणा गावांमध्ये घरफोडी केल्याची तसेच हातचलाखीने 6 मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून खालीलप्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला—

🔐 जप्त मुद्देमाल

₹10,000 रोख रक्कम

सोन्याच्या कानातील रिंग व कानातले (एकूण अंदाजे ₹1 लाख)

2 बेंटेक्स पोत

रेडमी, व्हिवो, टेक्नो, सॅमसंग, रेडमी अशा कंपनीचे एकूण 6 मोबाईल फोन

बजाज पल्सर 220 सीसी मोटारसायकल (MH-12/LR-0945)

👉 एकूण जप्त मुद्देमाल: ₹2,76,000/-

या कारवाईतून नरडाणा पोलीस ठाण्यातील गुन्हा र.नं. 96/2026 व 109/2026 असे दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही उल्लेखनीय कामगिरी विशाल आनंद (पोलीस अधीक्षक, धुळे), अजय देवरे (अपर पोलीस अधीक्षक) आणि विश्वजित जाधव (उपविभागीय पोलीस अधिकारी) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.



#NardanaPolice

#DhuleNews

#PoliceAction

#CrimeNews

#HouseBreaking

#TheftCase

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने