कोडीद येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’; ४०४ लाभार्थ्यांना थेट योजनांचा लाभ
शिरपूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या आदेशानुसार ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व महिलांच्या महसूल विभागाशी संबंधित प्रश्नांचे तात्काळ निराकरण करण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ अभियानांतर्गत शिरपूर तालुक्यातील कोडीद येथे गुरुवारी (दि. १२ मार्च) शिबिराचे आयोजन करण्यात आले.
मा. जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते व मा. उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिराचे उद्घाटन तहसीलदार महेंद्र माळी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सतार सिंग पावरा, विष्णू भाबड, उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाचे अधिकारी तसेच तहसील कार्यालयातील विविध शाखांचे अधिकारी-कर्मचारी, कोडीद मंडळातील सरपंच, उपसरपंच, मंडळ अधिकारी व तलाठी उपस्थित होते.
शिबिरात महसूल विभागाच्या विविध सेवांचा लाभ नागरिकांना थेट देण्यात आला. सेतु शाखेमार्फत १९३ उत्पन्न व डोमिसाईल दाखले, संजय गांधी शाखेमार्फत ५० मंजूर प्रकरणांची वाटप पत्रे, तर पुरवठा विभागामार्फत ७५ नवीन व दुबार शिधापत्रिका वाटप करण्यात आल्या. याशिवाय ७/१२ उतारे व ८-अचे ४९ उतारे, भूमी अभिलेख विभागाकडून ५ मालमत्ता पत्रक सनदी व माहितीपत्रके, ट्रॅक्टर कृषी कर्जासाठी ५ प्रकरणे, ७/१२ दुरुस्तीची १२ प्रकरणे तसेच १५ जन्म दाखले नागरिकांना देण्यात आले.
या शिबिरात एकूण ४०४ लाभार्थींनी उपस्थित राहून विविध योजनांचा लाभ घेतला, तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती प्रत्येक स्टॉलला भेट देऊन जाणून घेतली.
यावेळी अध्यक्षीय भाषणात तहसीलदार महेंद्र माळी यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान’चा मुख्य उद्देश स्पष्ट करत ग्रामीण भागातील विद्यार्थी, शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांनी अशा शिबिरांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी कोडीद मंडळातील सर्व तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
