‘कायदेशीर एमएसपी द्या, कर्जमाफी करा’ – देशव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवर शिरपूरात आंदोलन
सविस्तर बातमी
शिरपूर (धुळे) :
देशभर पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपाला शिरपूर तालुक्यातही जोरदार प्रतिसाद मिळाला. आशा व गटप्रवर्तक संघटना, महाराष्ट्र राज्य किसान सभा आणि लालबावटा शेतमजूर युनियन यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (दि. १२ फेब्रुवारी) शिरपूरात शेतकरी-कामगारांचा मोर्चा काढण्यात आला. विविध शेतकरी व कामगार मागण्यांसाठी निघालेला हा मोर्चा चोपडा जिनपासून सुरू होऊन प्रांत कार्यालयापर्यंत शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यात आला.
मोर्चामध्ये आशा व गटप्रवर्तक, शेतकरी, शेतमजूर आणि विविध संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मुख्य मार्गावरून घोषणाबाजी करत मोर्चा प्रांत कार्यालयावर पोहोचला. तेथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी व कामगारविरोधी धोरणांचा निषेध करण्यात आला.
यावेळी अॅड. हिरालाल परदेशी, अॅड. संतोष पाटील, स्मिता दोरीक, मालती इंदवे, अर्जुन कोळी, रामचंद्र पावरा, भरत सोनार, सचिन थोरात, अरुणा देवरे आदींनी आंदोलनाचे नेतृत्व केले व सभेला मार्गदर्शन केले. शेतकरी, आशा कार्यकर्त्या व गटप्रवर्तक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मोर्चानंतर संघटनांच्या प्रतिनिधींनी उपविभागीय अधिकारी डॉ. शरद मंडलिक यांना निवेदन सादर केले. यावेळी तहसीलदार महेंद्र माळी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रसन्न कुलकर्णी, पंचायत समिती व कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. निवेदनातील मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. स्थानिक स्तरावरील काही मागण्या सोडवण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.
प्रमुख मागण्या
निवेदनात शेतकरी व कामगारांच्या विविध मागण्या मांडण्यात आल्या. त्यामध्ये शेतमालाला कायदेशीर हमीभाव (एमएसपी) देण्यासाठी कायदा करणे, शेतकऱ्यांचा स्वतंत्र अर्थसंकल्प सादर करणे, शेतीसंदर्भातील आंतरराष्ट्रीय करार रद्द करणे, वीज दुरुस्ती विधेयक २०२५ रद्द करणे, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करून सातबारा कोरा करणे, दरमहा १० हजार रुपयांची पेन्शन देणे, वनजमिनीवरील दावे मंजूर करणे, पीककर्जासाठी बँकांना आदेश देणे, नुकसानभरपाई व इतर अनुदान तत्काळ देणे अशा मागण्या करण्यात आल्या.
संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, शेतकरी, कामगार व कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी देशव्यापी पातळीवर लढा उभारला जात असून, शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल.
देशव्यापी संपाला शिरपूर तालुक्यात मिळालेला प्रतिसाद हा शेतकरी-कामगारांच्या वाढत्या असंतोषाचे प्रतीक असल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.
