“स्वाभिमानाची अखंड मशाल : महाराणा प्रताप – राष्ट्रगौरवाचा अमर योद्धा”
संपादकीय - महेंद्रसिंह राजपूत
“जो दृढ राखे धर्म को, तिही राखे करतार”
या ओळींचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह. भारतीय इतिहासाच्या सुवर्णपानांवर ज्यांचे नाव केवळ शौर्यानेच नव्हे, तर स्वाभिमान, त्याग आणि आत्मगौरवाने कोरले गेले आहे, असे राष्ट्रनायक म्हणजे महाराणा प्रताप.
मेवाडच्या मातीत जन्मलेला हा सिंह मोगल साम्राज्याच्या प्रचंड सत्तेसमोर कधीही झुकला नाही. सत्ता, संपत्ती, राजवैभव, ऐश्वर्य यांचा मोह नाकारून स्वराज्य आणि स्वधर्मासाठी झुंज देणारा महाराणा प्रताप हा केवळ राजा नव्हता, तर तो एक विचार होता, एक चेतना होती.
हल्दीघाटी : पराभव नव्हे, इतिहासाची घोषणा
हल्दीघाटीच्या रणांगणावर जे घडले, ते केवळ युद्ध नव्हते; तो स्वाभिमानाचा महामंत्र होता. हजारोंच्या मोगल सैन्यासमोर मोजक्या मावळ्यांसह उभा ठाकलेला महाराणा प्रताप म्हणजे अन्यायाविरोधातील अडिग उभेपणा. रणांगणावर त्यांचा पराभव झाला असे म्हणणे हा इतिहासावर अन्याय ठरेल, कारण त्या युद्धात हरला नाही तो राणा प्रतापांचा आत्मसन्मान.
जंगलात उपाशीपोटी जीवन जगणे, कुटुंबासह हालअपेष्टा सहन करणे, गवताची भाकरी खाणे त्यांनी मान्य केले; पण यवनांसमोर मान झुकवणे कधीही मान्य केले नाही. हाच त्यांचा खरा विजय होता.
स्वराज्य, स्वधर्म आणि स्वाभिमानाचा दीपस्तंभ
महाराणा प्रताप यांनी केवळ तलवारीने नव्हे, तर विचारांनीही लढा दिला. अखंड भारतात परकीय सत्तेला शरण न जाण्याची प्रेरणा त्यांनी दिली. त्यांच्या संघर्षामुळेच भारतीय मनात स्वातंत्र्याची ज्योत तेवत राहिली. छत्रपती शिवाजी महाराजांपासून पुढील अनेक राष्ट्रनायकांपर्यंत, राणा प्रताप हे प्रेरणास्थान ठरले.
त्यांचा संघर्ष हा सत्तेसाठी नव्हता, तर मातृभूमीच्या सन्मानासाठी होता. म्हणूनच महाराणा प्रताप हे केवळ राजपूतांचे नव्हे, तर संपूर्ण भारताचे राष्ट्रनायक आहेत.
आज, त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने महाराणा प्रताप आपल्याला एक स्पष्ट संदेश देतात —
स्वाभिमान तडजोडीत विकायचा नसतो,
स्वातंत्र्य सहज मिळत नाही,
आणि राष्ट्रासाठी त्याग अपरिहार्य असतो.
स्वार्थ, भीती आणि सत्तेच्या मोहाने झुकणाऱ्या काळात महाराणा प्रतापांची आठवण ही नैतिक बळ देणारी मशाल आहे.
मातृभूमीसाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या, अन्यायासमोर न झुकणाऱ्या, स्वधर्म-स्वराज्याचे रक्षण करणाऱ्या वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह यांना त्यांच्या पुण्यतिथी निमित्त कोटी-कोटी नमन.
महाराणा प्रताप अमर रहें!
स्वाभिमान अमर रहें!
भारत माता की जय!
