*आण्णाबाबांच्या स्वप्नातील देवमाणूस : डॉ. राहुल कामडे*
सातपुड्यातील आदिवासी महिलांसाठी देवदूत ठरले डॉ. राहुल कामडे
बोराडी | प्रतिनिधी
खान्देशातील आदिवासी समाजासाठी मसिहा म्हणून ओळखले जाणारे थोर स्वातंत्र्यसेनानी स्वर्गीय आण्णासाहेब कर्मवीर व्यंकटराव रणधीर यांनी आपले संपूर्ण आयुष्य आदिवासी, गरीब व वंचित समाजाच्या शिक्षण व आरोग्यासाठी वाहिले. शिक्षणाशिवाय समाजाचा विकास शक्य नाही, हे त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध केले. शिरपूर तालुक्यासह संपूर्ण खान्देशात त्यांनी शैक्षणिक क्रांती घडवून आणत आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणले.
जर आण्णाबाबा नसते, तर आज शेतकरी व शेतमजूर कुटुंबातील मुले डॉक्टर, इंजिनिअर तसेच उच्चशिक्षित अधिकारी म्हणून समाजात उभी राहिली नसती. शिक्षणाइतकेच आरोग्यही समाजासाठी महत्त्वाचे आहे, हे आण्णाबाबांनी ओळखले होते. त्यामुळेच त्यांनी आयुष्यभर आदिवासी समाजाच्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिले.
*एका दुर्दैवी घटनेतून जन्मले आरोग्यसेवेचे स्वप्न*
एके काळी प्रसूतीदरम्यान आरोग्यसेवेअभावी एका आदिवासी महिलेचा मृत्यू झाल्याने आण्णाबाबा अत्यंत व्यथित झाले होते. ही परिस्थिती कायमची कशी थांबवता येईल, याचा विचार करत त्यांनी ठोस पावले उचलली. अखेर १९७२ साली खान्देशातील पहिले शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय सुरू करून त्यांनी आदिवासी समाजासाठी आरोग्यसेवेचा भक्कम पाया घातला. अनेक अडथळे असूनही दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी हे स्वप्न साकार केले.
*आण्णाबाबांच्या स्वप्नातील देवमाणूस*
आज त्या स्वप्नातीलच एक हिरा म्हणजे डॉ. राहुल कामडे. स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विषयात तज्ज्ञ असलेले डॉ. कामडे (एम.डी., पी.एच.डी.) गेल्या वीस वर्षांपासून आदिवासी व गरीब महिलांसाठी अविरत सेवा देत आहेत. कर्मवीर व्यंकटराव रणधीर आयुर्वेद महाविद्यालयाशी संलग्न लीलाई हॉस्पिटल, बोराडी येथे ते रात्रंदिवस गरोदर मातांसाठी तत्पर असतात.
अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा नसतानाही केवळ शुद्ध आयुर्वेदिक चिकित्सा, अनुभव आणि कौशल्याच्या जोरावर त्यांनी अनेक अतिजोखमीच्या प्रसूती यशस्वी केल्या आहेत. नवप्रसूता माता, वंध्यत्वग्रस्त जोडपी, तसेच स्त्रियांच्या विविध आजारांवर त्यांनी दिलेली उपचारपद्धती अनेकांसाठी आशेचा किरण ठरली आहे.
*९० टक्क्यांहून अधिक आदिवासी महिलांचा विश्वास*
सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या बोराडी परिसरात लीलाई हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांपैकी ९० टक्क्यांहून अधिक महिला आदिवासी आहेत. मोठ्या शहरांकडे धाव घेण्याच्या काळात बोराडीसारख्या दुर्गम भागात राहून आदिवासी गरीब महिलांसाठी अहोरात्र झटणारे डॉ. राहुल कामडे हे खऱ्या अर्थाने देवमाणूस ठरले आहेत.
*राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव*
डॉ. राहुल कामडे यांना त्यांच्या सामाजिक व वैद्यकीय सेवेबद्दल राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. अमेरिकेतील ग्लोबल आयुर्वेद कॉन्फरन्समध्ये संशोधन सादरीकरण, राष्ट्रीय संशोधन पुरस्कार, ग्लोबल आयकॉन अवॉर्ड, तसेच कोविड-१९ काळातील उल्लेखनीय सेवेसाठी विविध संस्थांकडून प्रशंसापत्रे मिळाली आहेत.
*समाजासाठी आदर्श*
डॉ. राहुल कामडे यांनी आदिवासी व ग्रामीण महिलांसाठी आदर्श स्तनपान पद्धती व स्तनकर्करोगाच्या लवकर निदानासाठी स्वयं-परीक्षणाबाबत विशेष प्रशिक्षण कार्यक्रम राबवले आहेत. त्यामुळे अनेक महिलांमध्ये आरोग्याबाबत जागृती निर्माण झाली आहे.
डॉ. राहुल कामडे यांचे ज्ञान, अनुभव व मार्गदर्शन तालुक्याला अधिकाधिक मिळाले पाहिजे. लीलाई हॉस्पिटल, बोराडी येथे उपलब्ध असलेल्या आयुर्वेद व आधुनिक वैद्यकीय सुविधांचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
लेखांकन :
*✒️ डॉ. हिरा पावरा*
अध्यक्ष – महाराष्ट्र आदिवासी डॉक्टर्स असोसिएशन (MADA), शिरपूर
📞 ९९७५०८५४८३
