शिरपूर शहरात 30 व 31 जानेवारी रोजी भव्य निशाण शोभायात्रा व "एक शाम श्री खाटू श्याम के नाम" कार्यक्रमाचे भव्य आयोजन, उत्तर प्रदेश, राजस्थान व मध्य प्रदेश येथील प्रख्यात भजन गायकांची उपस्थिती
शिरपूर (प्रतिनिधी) शिरपूर शहरात श्री श्याम सेवा समिती शिरपूर द्वारा भव्य निशान शोभायात्रा तसेच भजन संध्या आयोजित करण्यात आले आहे. या भव्य भजन संध्या कार्यक्रमात उत्तर प्रदेश कानपूर येथील प्रख्यात भजन गायक श्रेष्ठ दीक्षित, उदयपूर राजस्थान येथील ख्यातनाम भजन गायिका केमीताजी राठोड यांच्यासह मध्य प्रदेश सेंधवा येथील सुविख्यात भजन गायक ओजस शर्मा हे आपल्या सुमधुर वाणीने भजन सादर करून वातावरण भक्तीमय करणार आहेत श्री खाटू शाम हे राजस्थान मधील विश्वव्याख्यात जागृत देवस्थान आहे.
30 जानेवारी शनिवार रोजी सायंकाळी 4 वाजता मान्यवरांच्या हस्ते महाआरती केल्यानंतर शहरातील श्री पाताळेश्वर मंदिर येथून भव्य निशान व शोभा यात्रा आरंभ होणार आहे. श्री खाटू श्याम यांच्या जीवनावर आधारित विविध चलचित्र युक्त झाकी तसेच आकर्षकपणे सुशोभित केलेले व श्री खाटू श्याम यांचे शीश विराजमान केलेली बग्गी शोभा यात्रेचे मुख्य आकर्षण असणार आहे.
या शोभायात्रेत बँड, भजनी मंडळ यांच्यासह इस्कॉन तर्फे श्री खाटू श्याम वर आधारित भक्ती गीतांवर नृत्य देखील सादर केले जाणार आहे. शोभा यात्रेत सहभागी होणाऱ्या पुरुषांनी पांढरा कुर्ता पायजामा व महिलांनी पिवळी साडी परिधान करावे असे समितीतर्फे कळविण्यात आले आहे. नेत्र दीपक विद्युत रोषणाई व भव्य आतिश बाजी हे शोभा यात्रेचे विशेष आकर्षण ठरणार आहे. निशाण यात्रा श्री पातळेश्वर मंदिर चौक येथून आरंभ होऊन विजय स्तंभ, गुजराती कॉम्प्लेक्स, बस स्टॅन्ड या मार्गाने "जनक विला" जवळून जाणाऱ्या रस्त्याने अहिल्या लॉन्स च्या जवळ असलेल्या कार्यक्रम स्थळी पोहोचल्यावर शोभायात्रेत सामील असलेले निशाण तिथे स्थापित करण्यात येतील. निशान यात्रेदरम्यान ठिकठिकाणी अल्पोपहार, पेयजल व थंड पेयाची व्यवस्था करण्यात आली आहे. मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी देखील करण्यात येईल.
31 जानेवारी रविवार रोजी संध्याकाळी 6 वाजता "एक शाम श्री खाटू श्याम के नाम' या भव्य कार्यक्रमाचे आयोजन अहिल्या लॉन्सच्या मागे असलेल्या भव्य मैदानावर करण्यात आले आहे. या ठिकाणी श्री खाटू श्याम यांचे भव्य दरबार शृंगार करून सजविण्यात येणार असून याप्रसंगी छप्पन भोग चे प्रसाद श्री खाटू श्याम यांना अर्पण करण्यात येणार आहे. यावेळी इत्र वर्षा, पुष्प वर्षा व अखंड ज्योत प्रज्वलना सोबत फाग महोत्सवाचे आयोजनही करण्यात आले आहे. धार्मिक आयोजनासोबत सामाजिक बांधिलकीचे बांध ठेवून श्री श्याम सेवा समितीद्वारे भव्य रक्तदान शिबिरही आयोजित करण्यात आले आहे. भजन संध्या कार्यक्रमाच्या समापनानंतर भाविकांना महाप्रसाद (भंडारा) वितरित करण्यात येईल.
श्री श्याम सेवा समिती शिरपूर द्वारे हा कार्यक्रम सर्व भाविक जनतेसाठी दुसऱ्या वर्षी देखील विनाशुल्क आयोजित करण्यात आले असून भाविक जनतेने मोठ्या संख्येने निशान व शोभायात्रेत तसेच श्रीश्याम संध्या भजन संध्या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन श्री श्याम सेवा समिती,शिरपूर तर्फे करण्यात आले आहे. समितीचे सर्व सदस्य कार्यक्रम यशस्वीतेसाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत.
