ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ४० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक; धुळे लाचलुचपत विभागाची यशस्वी सापळा कारवाई

 


ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ४० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक; धुळे लाचलुचपत विभागाची यशस्वी सापळा कारवाई

अमळनेर, ता. १९ मे – ग्रामपंचायत कार्यालयात रस्ता कामासाठी आलेल्या बिलाच्या मोबदल्यात १० टक्के लाचेची मागणी करणाऱ्या तामसवाडी (ता. पारोळा) येथील ग्रामसेवक दिनेश वासुदेव साळुंखे (वय ५३) यांना आज अंमळनेर येथे लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही यशस्वी सापळा कारवाई केली.

तक्रारदार हे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत सरकारी रस्त्याचे काम करणारे ठेकेदार असून त्यांनी ५ लाख रुपयांचे काम पूर्ण केले होते. त्याचे चार लाखांचे बिल ग्रामपंचायतकडून अदा करण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्या कामासंबंधी चौकशीसाठी तक्रारदार आणि त्यांचे चुलत काका ग्रामपंचायत कार्यालयात गेले असता, ग्रामसेवक दिनेश साळुंखे यांनी ४०,००० रुपयांची लाचेची मागणी केली.

तक्रारदाराने ही माहिती धुळे लाचलुचपत विभागाला दिल्यानंतर १९ मे रोजी पडताळणी करताना आरोपीने अंमळनेर येथील राजे संभाजी चौकात तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारली आणि तिथून दुचाकीने पळून गेला. मात्र, पोलिसांनी त्याला लगेच शोधून ताब्यात घेतले.

या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपी दिनेश साळुंखे हे जळगाव जिल्ह्यातील तामसवाडी ग्रामपंचायतीचे (वर्ग ३) अधिकारी असून त्यांचे नियंत्रण मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जळगाव यांच्याकडे आहे.

ही सापळा कारवाई पोलीस उपअधीक्षक श्री. सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक रूपाली खांडवी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या पथकात पो. हवा. राजन कदम आणि पो. कॉ. प्रशांत बागुल सहभागी होते. संपूर्ण मोहिमेचे मार्गदर्शन मा. पोलीस अधीक्षक (ला.प्र.वि.) नाशिक परीक्षेत्राच्या मा. श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांनी केले.

ही कारवाई भ्रष्टाचाराविरोधात मोठा संदेश देणारी असून, शासनाच्या निधीचा अपहार थांबवण्यास आणि पारदर्शकता आणण्यास उपयुक्त ठरणार आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने