"शिरपूर मर्चंट्स बँकेत १३.७५ कोटींचा आर्थिक घोटाळा!"
४९ जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा; सहकारी बँक व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह
शिरपूर, २५ मे २०२५ – शिरपूर शहरातील एकेकाळी विश्वासार्ह समजली जाणारी शिरपूर मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक लि. आता एका मोठ्या आर्थिक घोटाळ्याच्या भोवऱ्यात सापडली आहे. बँकेतील कर्जवाटप प्रक्रियेत नियमांचे व कायद्यांचे सर्रास उल्लंघन करत १३ कोटी ७५ लाख ८६ हजार २५३ रुपयांचा आर्थिक अपहार केल्याचे उघड झाले असून, या प्रकरणी ४९ आरोपींविरोधात फसवणूक, बनावट कागदपत्रे आणि विश्वासघाताचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
फिर्यादी अजय नंदलाल राठी (वय ५१, सनदी लेखापाल) यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२३ ते २०२४ या कालावधीत बँकेच्या विविध अधिकाऱ्यांनी आणि कर्जदारांनी संगनमताने कर्ज वाटपात अनियमितता केली. यात काही कर्जदारांकडून कोणतीही तारण न घेता (विनातारण कर्ज), बनावट वाहन हायपरफिकेशन दस्तऐवज सादर करून आणि कोल्ड स्टोरेज कर्जाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
कर्जवाटपातील घोटाळ्याचा तपशील:
१. विनातारण कर्ज (Unsecured Loans) – ₹ २३,५०,०००
फक्त तीन व्यक्तींना कोणतेही तारण किंवा योग्य खात्रीशीर दस्तावेज नसताना कर्ज दिले गेले:
२. हायपरफिकेशन कर्ज (Vehicle Loan) – ₹ ९,७८,६४,५१०
संपूर्ण २८ जणांच्या वाहन कर्ज प्रकरणांमध्ये बनावट कागदपत्रे वापरून कर्ज मिळवले गेले. यात बँक आणि पतसंस्था पदाधिकाऱ्यांनीही प्रत्यक्ष सहभाग घेतल्याचे आरोप आहेत.
३. कोल्ड स्टोरेज लोन – ₹ ३,७३,७१,७४३
या भागात १३ जणांना मोठ्या प्रमाणावर कर्ज दिले गेले. मात्र परतफेड टाळण्यात आली. व्यवस्थापन समितीने यातील कर्ज पुनर्प्राप्तीचे कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही.
या सर्व प्रकारामुळे १३ कोटी ७५ लाख ८६ हजार २५३ हा आर्थिक घोटाळा असल्याची यात नमूद केले आहे.
या तिन्ही प्रकारच्या कर्ज वाटपाच्या व्यवहारात बँकेचे व्यवस्थापन, आणि बँक कर्मचारी यांनी संगनमताने ठरवून फसवणूक केली असून, त्यामुळे बँकेच्या ठेवीदारांना आणि संस्थेला मोठा आर्थिक फटका बसला आहे.
या संपूर्ण प्रकाराची दखल घेत शिरपूर शहर पोलीस ठाण्यात दिनांक २५ मे २०२५ रोजी गुन्हा क्र. २८५/२०२५ नोंदवण्यात आला आहे. फिर्यादीत IPC कलम ४०३, ४०९, ४२०, १२०(ब) अन्वये फसवणूक, अपहार, विश्वासघात व कट कारस्थान रचण्याचे आरोप ठेवण्यात आले आहेत. पोलिसांनी तक्रारीसह तब्बल ४९ आरोपींची नावे FIR मध्ये नमूद केली आहेत. विशेष म्हणजे यात कर्जदारांसोबत बँकेचे तत्कालीन चेअरमन प्रसन्न जैन, बँकेचे मॅंनेजर संजय केशवराव कुलकणी, महेश पंडितलाल गुजराथी, दिलीप बाळकृष्ण कापडी यांच्या देखील नावाचा समावेश आहे. आणि इतर आरोपीचे कर्जदार आहेत.
या सर्व घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ माजली असून हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पुढे काय प्रशासकीय कारवाई होते ,याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे.
