कर्तव्यदक्षतेचा आदर्श: धुळेच्या नवीन जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांची प्रेरणादायी प्रशासकीय वाटचाल"

 



कर्तव्यदक्षतेचा आदर्श: धुळेच्या नवीन जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांची प्रेरणादायी प्रशासकीय वाटचाल"



धुळे जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार नुकताच स्वीकारलेल्या भाग्यश्री दिलीप विसपुते या एक कर्तव्यदक्ष, अभ्यासू आणि प्रामाणिक प्रशासकीय अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. २०१७ बॅचच्या भारतीय प्रशासनिक सेवेत (IAS) निवड झालेल्या विसपुते यांचा जन्म मालेगाव येथे झाला. त्यांनी शालेय शिक्षण जवाहर नवोदय विद्यालय, नागपूर येथे पूर्ण केलं असून, बी.फार्मसी पदवीत त्यांनी चारही वर्षं विद्यापीठात अव्वल क्रमांक पटकावला होता – ही त्यांच्या मेहनतीची ठसठशीत पावतीच होती.


विसपुते यांनी UPSC नागरी सेवा परीक्षा २०१६ मध्ये देशभरातून १०३ वा क्रमांक मिळवून यश संपादन केलं. लेखी परीक्षेत ८७९ गुण व मुलाखतीत १५७ गुण मिळवत त्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली. दररोज १५-१६ तासांच्या अभ्यासाच्या जोरावर त्यांनी हे यश मिळवलं – जे अनेकांसाठी प्रेरणादायी ठरलं आहे.


प्रशासकीय सेवेत त्यांनी विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. त्यांनी पांढरकवडा (जि. यवतमाळ) येथे आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी, बुलढाणा आणि चंद्रपूर जिल्ह्यात मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच छत्रपती संभाजीनगर येथे सिडकोच्या मुख्य प्रशासकपदी काम पाहिलं आहे. याशिवाय कोविड-१९ महामारीच्या काळात त्यांनी नागपूरच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात कोविड वॉर रूमची जबाबदारी अतिशय कुशलतेने सांभाळली. रुग्णालयातील बेड व्यवस्थापन, ऑक्सिजन पुरवठा आणि सेवांची निगराणी ही त्यांच्या कार्याची महत्त्वाची वैशिष्ट्यं होती.


मे २०२५ पासून धुळे जिल्हाधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारलेल्यां भाग्यश्री विसपुते यांच्याकडून जिल्ह्याला विकासाची नवी दिशा लाभेल, अशी जिल्ह्यातील जनतेत अपेक्षा आहे. त्यांची शैक्षणिक गुणवत्ता, प्रामाणिक वृत्ती, आणि प्रशासनातील अनुभव पाहता धुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी त्यांचे नेतृत्व लाभदायक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे शिरपूर तालुका से देखील त्यांची नाव जोडलेले असून तालुक्यातील भाटपुरा येथे त्यांचे आजोबा वास्तव्यास आहेत.

त्यामुळे त्यांच्या कार्यकाळात तालुक्याला आणि जिल्ह्याला विकासाची चालना मिळो हीच सदिच्छा..

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने