"धुळे जिल्ह्याचा कार्यक्षमतेत डंका! 17 तालुका कार्यालये नाशिक विभागात ठरली उत्कृष्ट"
धुळे, 17 मे (प्रतिनिधी) – राज्य सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात धुळे जिल्ह्याने उल्लेखनीय यश मिळवले असून, जिल्ह्यातील एकूण 17 तालुका कार्यालये नाशिक विभागातील उत्कृष्ट कार्यालयांमध्ये निवडली गेली आहेत.
या योजनेत शिरपूर, धुळे आणि साक्री तालुक्यांतील प्रत्येकी पाच कार्यालयांनी उत्तम कामगिरी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यात राबविण्यात आलेल्या "100 दिवस कृति आराखडा" उपक्रमात 10,000 हून अधिक शासकीय कार्यालयांनी सहभाग घेतला होता.
कार्यशैलीत पारदर्शकता, नागरिकाभिमुख सेवा, डिजिटल व्यवहार, वेळेवर सेवा वितरण यामुळे धुळे जिल्ह्याच्या कार्यालयांनी उल्लेखनीय प्रगती साधली.
धुळे विभागात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या दोन कार्यालयांमध्ये दुय्यम निबंधक, धुळे-2 आणि वन परिक्षेत्र अधिकारी, साक्री यांचा समावेश आहे.
व्दितीय क्रमांकाचे मानकरी:
उपविभागीय अधिकारी, शिरपूर, प्रकल्प अधिकारी (बाल विकास), बाल संरक्षण अधिकारी, मुख्याधिकारी (नगरपरिषद, शिरपूर), तालुका क्रीडा अधिकारी (साक्री), गट शिक्षण अधिकारी (धुळे) – ही कार्यालये व्दितीय स्थानी राहिली.
तृतीय क्रमांकाची यादी:
तहसीलदार (शिरपूर), उप अधीक्षक (भू-अभिलेख, साक्री), गट विकास अधिकारी (शिंदखेडा), पोलिस निरीक्षक (पश्चिम देवपूर), उप विभागीय वन अधिकारी (धुळे), उप अभियंता (ग्रामीण पाणीपुरवठा, साक्री), सहायक पशुसंवर्धन आयुक्त (शिंदखेडा), उप विभागीय जलसंधारण अधिकारी (धुळे), सहायक निबंधक (साक्री) या कार्यालयांनी ही यशाची नोंद केली.
या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे व महापालिका आयुक्त अमिता दगडे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.
पालकमंत्री जयकुमार रावल यांनी सर्व निवड झालेल्या कार्यालय प्रमुखांचे अभिनंदन करत, “हा उपक्रम सामान्य जनतेला पारदर्शक, जलद सेवा देणारा ठरणार आहे,” असे मत व्यक्त केले.
