देवपूरमध्ये लाचखोरीचा यशस्वी सापळा – खाजगी तंत्रज्ञ रंगेहात अटक
धुळे – ला.प्र.वि. (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) धुळे युनिटच्या चमकदार कारवाईत देवपूर येथील खाजगी तंत्रज्ञास 30,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे.
तक्रारदार हे देवपूर, धुळे येथे जैस्वाल लिकर बार या देशी दारू विक्री दुकानाचे मालक आहेत. त्यांच्या दुकानातील जुने वीज मीटर महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (म.रा.वि.वि.) तर्फे बदलण्यात आले होते. ही कारवाई NCC कंपनीच्या खाजगी तंत्रज्ञ मुकुंद लक्ष्मण दरवडे (रा. संत कबीर नगर, देवपूर) यांच्यामार्फत करण्यात आली होती.
मीटर बदलल्यानंतर दरवडे यांनी तक्रारदाराकडे वारंवार येत, "तुमच्या जुन्या मीटरमध्ये छेडछाड आढळली आहे, वीजचोरीचे प्रकरण दाखल होऊ शकते," अशी भीती दाखवत 46,000 रुपये दंड टाळण्यासाठी 30,000 रुपयांची लाचेची मागणी केली. तक्रारदाराने ही बाब थेट ला.प्र.वि. विभागाच्या धुळे कार्यालयात कळवली.
दिनांक 15 एप्रिल 2025 रोजी पंचासमक्ष पडताळणी केल्यानंतर, दरवडे यांनी 30,000 रुपयांची लाच स्वीकारण्यास सहमती दर्शवली. त्यानंतर सापळा रचण्यात आला आणि जैस्वाल लिकर बारमध्येच दरवडे यांनी लाच स्वीकारताना त्यांना रंगेहात अटक करण्यात आली.
या कारवाईत आरोपीचा मोबाईल जप्त करण्यात आला असून त्याची तपासणी सुरू आहे. तसेच NCC कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क करून अधिक माहिती घेतली जात आहे.
ही कारवाई मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नाशिक परीक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या संपूर्ण सापळा कारवाईचे नेतृत्व पोलीस उपअधीक्षक श्री. सचिन साळुंखे यांनी केले. तपासाधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक रूपाली खांडवी यांनी जबाबदारी सांभाळली. पथकात पो.हवा. राजन कदम व पो.कॉ. प्रशांत बागुल यांचा समावेश होता.
