बोराडी ग्रामपंचायतीचे राज्यस्तरीय यश! राजीव गांधी गतिमान प्रशासन स्पर्धेत द्वितीय क्रमांक




बोराडी ग्रामपंचायतीचे राज्यस्तरीय यश! राजीव गांधी गतिमान प्रशासन स्पर्धेत द्वितीय क्रमांक

बोराडी (ता. शिरपूर) – शासनाच्या राजीव गांधी गतिमान प्रशासन स्पर्धेतील ग्रामपंचायत गटात बोराडी गावाने राज्यात द्वितीय क्रमांक पटकावून शिरपूर तालुक्याचा नावलौकिक वाढवला आहे. सन २०२३-२४ मध्ये उत्कृष्ट प्रशासकीय कार्याची दखल घेत शासनाने बोराडी ग्रामपंचायत आणि ग्रामसेवक श्री. ज्ञानेश्वर पेंढारकर यांचा विशेष सन्मान केला.

सदर पुरस्कार वितरण समारंभात आदर्श सरपंच म्हणून श्री. सुखदेव भिल व उपसरपंच श्री. राहुल रंधे यांचाही गौरव करण्यात आला. आदिवासी व डोंगराळ भागातील बोराडी ग्रामपंचायतीने सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत आदर्श ग्रामपंचायतीचा लौकिक मिळवला आहे. सरपंच व ग्रामसेवक ही विकासाच्या रथाची दोन चाकं ठरून गावाच्या समृद्धतेसाठी एकजुटीने काम करत आहेत.

उपसरपंच राहुल रंधे यांच्या पुढाकाराने आणि कार्यक्षम नियोजनामुळे बोराडीने अनेक शासकीय व इतर पुरस्कार पटकावले आहेत. यामध्ये २०२० मधील आर. आर. पाटील सुंदर गाव पुरस्कार, २०२१ मध्ये संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता पुरस्कार, २०२२ मध्ये सरपंच ऑफ द इयर, २०२३ मध्ये माझी वसुंधरा अभियान ३.० मध्ये राज्यात प्रथम क्रमांक, २०२४ मध्ये माझी वसुंधरा अभियान ४.० मध्ये राज्यात तृतीय क्रमांक, आणि आता २०२५ मध्ये राजीव गांधी गतिमान प्रशासन पुरस्कार मिळवण्याचा मान बोराडीने पटकावला आहे.

राहुल रंधे म्हणाले, “आपण फक्त पुरस्कारासाठी नव्हे, तर खऱ्या अर्थाने लोकहितासाठी काम करत असतो. प्रत्येक कामामागे गावाच्या प्रगतीचा हेतू असतो. प्रशासन आणि सामान्य जनता एकत्रितपणे काम करत असतील तर अशा यशस्वी पावलांनी गावाचा विकास शक्य होतो.”

या यशामध्ये शिक्षणमंत्री आमदार अमरीशभाई पटेल, आमदार काशीराम पावरा, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, जिप मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश मोरे आणि गटविकास अधिकारी प्रदीप पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे त्यांनी सांगितले.

ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, व ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे बोराडी गावाने आदर्श विकासाचे उदाहरण उभे केले आहे. बोराडीचा हा सन्मान इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने