‘दारूबंदी’ ची मागणी: थाळनेर मधील महिलांचा हंबरडा आणि प्रशासनाचं मौन
वास्तव - संपादक महेंद्रसिंह राजपूत
शिरपूर तालुक्यातील थाळनेर गावात अलीकडेच उभं राहिलेलं एक आंदोलन समाजाच्या अंतःकरणाला हादरवून टाकणारं आहे. या गावातील शेकडो महिलांनी आपल्या अंगणातल्या वेदनांना आवाज देत थेट ग्रामपंचायत आणि पोलीस स्टेशनवर धडक मोर्चा नेला. त्यांची एकच मागणी—गावात दारूबंदी झाली पाहिजे!
या मागणी मागे केवळ एक सामाजिक विचार नव्हता, तर वर्षानुवर्षे अनुभवलेली वेदना, जिवंत झालेल्या दुःखाच्या कहाण्या आणि उध्वस्त होत चाललेलं ग्रामीण आयुष्य होतं. गावात कानाकोपऱ्यात, झाडांच्या आडोशाला, बंद खोलीच्या मागे, रस्त्यावर,आणि अगदी काही घरांमध्येही बेकायदेशीर दारू विक्री बिनधास्त सुरू आहे. या दारूमुळे अनेक तरुण व्यसनाधीन झाले, संसार मोडले, मुलांच्या भवितव्यास अंधार पडलाय. अनेक महिला विधवा झाल्या अनेक बालके अनाथ झाली. ही एक खरी पुरी सामाजिक वास्तविकता.
या गावात दारूच्या नशेत एका बापाने आपल्या दोन निष्पाप मुलांना तापी नदीत फेकून दिलं, ही घटना आजही गावाच्या हृदयावर ओरखडा उमटवते आहे. रोजच्या रोज घरातले पुरुष नशेत बुडून येतात, कामकाज करत नाहीत, आणि रागाचा निकाल आपल्या बायकोच्या अंगावर काढतात. या गावात कित्येक तरुणांचं लग्न होईना, कारण कोणतीही आई आपल्या मुलीला अशा व्यसनात बुडालेल्या घरात पाठवू इच्छित नाही. त्यातून समाज व्यवस्था आणि समाज संतुलन दिवसेंदिवस खराब होत आहे.
महिलांचा हा आक्रोश, हे आंदोलन काही तात्पुरत्या संतापाचं फलित नव्हतं. हे होते जगण्याच्या अस्तित्वासाठी केलेलं एक प्रयत्न. त्यांच्या डोळ्यांत होता धसका, पण मनात होत धैर्य. त्यांनी प्रशासनाकडे विनंती केली नाही, त्यांनी थेट जबाबदारी मागितली—आमचं गाव दारूमुक्त करा! आक्रोश आणि टाहो होता याच राज्यातील लाडक्या मांडल्या जाणाऱ्या बहिणीं चा, मात्र दुर्भाग्य असे की त्यांचे सर्वच सरकारी लाडके भाऊ सध्या निद्रावस्थेत आहेत. दारूबंदीची मागणी करून अनेक दिवस झाले. या आंदोलनानंतर तात्पुरत्या स्वरूपात कारवाई करण्यात आली. पण त्यातून फारसे काही साध्य झालं नाही.
तरी देखील चोरट्या मार्गाने दारू विक्री सुरूच आहे. उलट ती अधिक निर्भयपणे वाढली आहे. प्रशासनाने या महिलांच्या आक्रोशाकडे कानाडोळा केला आहे, आणि ग्रामपंचायतीच्या निष्क्रियतेने गावकऱ्यांच्या मनात असंतोष खदखदतो आहे. ग्रामसभेतूनच ग्रामपंचायतच्या शॉपिंग सेंटर मध्येच दारू विक्रीचा आरोप गावकऱ्यांनी लावला.
हा निष्क्रियतेचा खेळ लोकशाहीच्या मूळ तत्त्वांना सुरुंग लावणारा आहे. जनतेच्या मागण्या ऐकून त्यावर कारवाई करणं, हा एक निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींचा नैतिक आणि कायदेशीर जबाबदारीचा भाग आहे. पण इथे जनतेचे प्रतिनिधीच जनतेपासून दूर गेलेत. ते वाईट पेक्षा वाईट म्हणजे ‘मौन’ राखून समाजाच्या अधःपतनाला निमूटपणे मंजुरी देत आहेत. आणि जर असे नाही आहे तर मग यावर पावले का उचलली गेली नाहीत.
यातून व्यथित झालेले गावकरी आता नुसते पाहणारे उरले नाहीत. त्यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर पुढचं आंदोलन उभारण्याचा निर्धार केला आहे. हा लढा केवळ दारूविरोधी नाही, हा लढा आहे नशेमुक्त समाजासाठी, नव्या पिढीच्या उज्वल भविष्यासाठी आणि स्त्री-सन्मानासाठी.
दारूबंदी ही केवळ नियमावलीची बाब नाही, ती सामाजिक शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे. प्रशासन, पोलीस, आणि राजकारणी जर याकडे दुर्लक्ष करत असतील, तर हे केवळ निष्काळजीपणाचं नव्हे, तर एका गावाच्या आत्म्याशी केलेली गद्दारी आहे.
थाळनेर मधील स्त्रियांच्या या लढ्याला आवाज द्या. तो फक्त एका गावाचा संघर्ष नाही, तो समस्त ग्रामीण महाराष्ट्राच्या वेदनांचं प्रतिबिंब आहे. आज एका गावातून परिवर्तनाची सुरुवात झाली तर ती गावागावा पर्यंत पोहोचेल आणि त्यातून महाराष्ट्राला नशा मुक्त करण्यात येईल. आणि हीच लाडक्या बहिणींसाठी लाडक्या भावांनी दिलेली कर्तुत्वाची साथ असेल.
