*मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना;*
*26 एप्रिलला 800 ज्येष्ठ नागरिक विशेष रेल्वेने अयोध्येला रवाना होणार*
*पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत होणार यात्रेचा शुभारंभ*
धुळे, दिनांक 23 एप्रिल, 2025 (जिमाका वृत्तसेवा) : ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन’ योजनेअंतर्गत धुळे जिल्ह्यातील 800 पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात आली असून 26 एप्रिल, 2025 रोजी अयोध्या येथील श्रीराम मंदिर येथे तीर्थयात्रा निघणार आहे. या तीर्थदर्शन यात्रेस धुळे रेल्वे स्थानक येथून सकाळी 11.00 वाजता राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविला जाणार आहे. अशी माहिती समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सर्वधर्मीयांमधील 60 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थ दर्शन यात्रेची मोफत संधी देण्यासाठी ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ राज्य शासनाच्यावतीने राबविण्यात येत आहे. या योजनेत श्रीराम मंदिर (अयोध्या) येथे जाण्यासाठी जिल्ह्यातील निवड झालेल्या 800 लाभार्थ्यांना 26 ते 30 एप्रिल, 2025 या कालावधीत विशेष रेल्वेने पाठविण्यात येणार आहे. या यात्रेचा शुभारंभ राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, जिल्ह्यातील सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत शनिवार, 26 एप्रिल, 2025 रोजी सकाळी 11 वाजता धुळे रेल्वे स्थानकांवर विशेष रेल्वेस हिरवा झेंडा दाखवून करण्यात येणार आहे.
निवड झालेल्या लाभार्थ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्यात आला असून सर्व निवड झालेल्या लाभार्थ्यांनी 26 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता रेल्वे स्टेशन, धुळे येथे प्रस्तावित प्रवासासाठी उपस्थित रहावे, येताना मुळ आधारकार्ड, अलीकडील दोन रंगीत पासपोर्ट फोटो आणि शारिरीक तंदुरुस्तीबाबत सक्षम शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांचे 15 दिवसांपेक्षा जास्त जुने नसलेले मुळ वैद्यकीय प्रमाणपत्र सोबत आणावे. लाभार्थ्यांना नियोजित श्रीराम मंदिर, अयोध्या धाम (उत्तर प्रदेश) प्रवास कालावधीत चहा, नाश्ता, भोजन, रहिवासची व्यवस्था राज्य शासनामार्फत मोफत करण्यात येणार आहे. असे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त श्री. वसावे, विशेष अधिकारी (शानिशा) संजय सैंदाणे यांनी कळविले आहे.
000000
