*तहसील कार्यालय शिरपूर येथे जागतिक ग्राहक दिन साजरा*
तहसील कार्यालय शिरपूर येथे दिनांक 17 मार्च 2025 रोजी जागतिक ग्राहक दिन साजरा करण्यात आला. होळी, धुलीवंदन, शनिवार व रविवार अशा एकत्रित सुट्ट्या आल्या कारणाने 15 मार्च 2025 हा जागतिक ग्राहक दिन 17 मार्च 2025 रोजी साजरा करण्यात आला. तहसील कार्यालय शिरपूर व ग्राहक पंचायत महाराष्ट्र शासन शिरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने हा दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी ग्राहकांच्या विविध समस्या त्यावर ग्राहक कायद्याचे मार्गदर्शन यावर उपस्थित श्रोत्यांनी महत्त्वाची चर्चा केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा शिरपूरचे सचिव राकेश मोरे यांनी मांडले. त्यांनी जागतिक ग्राहक दिनाचा इतिहास, ग्राहकांच्या प्रबोधनाची आवश्यकता, ग्राहक विविध प्रकारे कशा पद्धतीने फसवला जातो, बनावट पनीर इत्यादी व याबाबत ग्राहक कायद्याची आवश्यकता याबाबत भाष्य केले. ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा शिरपूरचे वैद्यकीय प्रतिनिधी डॉक्टर सुभाष जगन्नाथ भंडारी यांनी रुग्ण ग्राहकांनी डॉक्टरांकडे गेल्यानंतर कोणत्या गोष्टी कटाक्षाने पाळल्या पाहिजेत व विचारले पाहिजेत. तसेच औषधोपचार त्याचे साईड इफेक्ट याबाबत डॉक्टरांकडे स्पष्ट विचारणा केली पाहिजे याबाबतचे मार्गदर्शन केले. ग्राहक पंचायत महाराष्ट्र शिरपूरचे सदस्य राजू लाल नथुलाल मारवाडी यांनी अन्न व औषध भेसळी बाबत तसेच या अनुषंगाने जागतिक ग्राहक दिनाची थीम म्हणजे उचित स्थायी जीवनशैली याबाबत भाष्य केले. शिरपूर तहसील कार्यालयाचे तालुका पुरवठा अधिकारी दिनेश ठाकरे यांनी ग्राहक दिनाच्या कार्यक्रमासाठी प्रशासन स्तरावरती केले जाणारे प्रयत्न व त्याला ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा शिरपूरचे मिळणारे सहकार्य याबाबत मनोगत व्यक्त केले. रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष राजू टेलर उर्फ बाळासाहेब यांनी जागतिक ग्राहक दिन व राष्ट्रीय ग्राहक दिन मोठ्या स्वरूपात साजरा करण्याचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानावरून बोलताना ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा शिरपूरचे अध्यक्ष राजेंद्र नारायण भंडारी यांनी ग्राहक कायदा व त्याबाबतचे ग्राहकांचे अधिकार व कर्तव्य तसेच नागरिक व लोक यातील फरक सांगितला. लहान मुले, तरुण पिढी यांनी ग्राहक म्हणून कोणती दक्षता घ्यावी याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण शांताराम पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन नंदकुमार यशवंत बोरसे यांनी केले. याप्रसंगी ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा शिरपूरचे उपाध्यक्ष गुलाब सिंग परदेशी, कार्यकारणी सदस्य एम के भामरे, महिला संघटक संगीता देवरे, कार्यकारणी सदस्या सीमा रंधे, सारिका रंधे, सहसचिव सतीश लोटन राव निकुंभे व राकेश देविदास चौधरी, खजिनदार राकेश राजाराम रघुवंशी, कार्यकारणी सदस्य निलेश माधवराव देसले, प्रसिद्धी प्रतिनिधी मयूर वैद्य व नवनीत पुरी आदी उपस्थित होते.