क्रांतिवीर खाज्या नाईक यांच्या स्मारकासह विविध समस्यांबाबत खासदार ॲड. गोवाल पाडवींकडे मागणी

 



क्रांतिवीर खाज्या नाईक यांच्या स्मारकासह विविध समस्यांबाबत खासदार ॲड. गोवाल पाडवींकडे मागणी


प्रतिनिधी, शिरपूर

          शिरपूर तालुक्यातील बाटवापाडा (आंबापाणी) येथे आदिवासी योद्धा, क्रांतिकारक खाज्या नाईक यांचे भव्य स्मारक करण्यासह पेसा अंमलबजावणी, ट्रामा केअर सेंटर, वनपट्टे धारकांना पीककर्ज मिळणे आदी मागण्या आदिवासी समाजाच्या वतीने शिरपूर तालुका युवक काँग्रेसकडून खासदार ॲड. गोवाल पाडवी यांच्याकडे निवेदनातून केल्या.


           निवेदनात म्हटले आहे की, शिरपूर तालुका कलम 244, 1 नुसार आदिवासी बहुल असल्याने तालुक्यात जवळपास 70% आदिवासी लोकसंख्या आहे. परंतु शिरपूर तालुक्यात आदिवासी क्रांतिवीरांचे आजही स्मारक नाही.  १८५७ च्या स्वातंत्र्य लढ्यातील एक महान आदिवासी योद्धा म्हणजे क्रांतिवीर खाज्या नाईक. १ एप्रिल १८५७ साली तालुक्यातील बाटवापाडा (आंबापाणी) येथील लढाईचे नेतृत्व क्रांतिवीर खाज्या नाईक यांनी केले होते. त्यावेळेस इंग्रजांविरोधात लढतांना १५०० भिल्ल आदिवासी सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली होती. १८५७ च्या उठावात खान्देशातील आदिवासी क्रांतिवीरांचे योगदान जस्टिस मॅकोर्थीने 'हिस्ट्री ऑफ युवर ऑन टाइम्स' या आत्मवृत्तात म्हटले आहे की, हा उठाव दक्षिण भारतापर्यत पोहचला होता. एल्फिन्स्टनेही अहवालात नमूद केले आहे. याबाबत ब्रिटिशकालीन पुरावे उपलब्ध आहेत. तालुक्यातील बाटवापाडा (आंबापाणी) येथे क्रांतिवीर खाज्या नाईक यांचे भव्य स्मारक व्हावे अशी मागणी विलास पावरा, अध्यक्ष बिरसा आर्मी, गेंद्या पावरा - अध्यक्ष, शिरपूर तालुका युवक काँग्रेस, दिलीप पावरा, भाईदास पावरा, विलास डावर यांनी केली.


दरम्यान धुळे जिल्ह्यात पेसा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे, आदिवासी वनपट्टे धारक शेतकऱ्यांना पीककर्ज मिळणे, सांगवी येथे ट्रामा केअर सेंटर सुरू करणे, आदिवासी गावांना सोलर लाईट खासदार निधीतून मंजूर करणे, प्रधानमंत्री आवास योजनेचा निधी 2 लाख 50 हजार करणे, मनरेगाची 100 दिवसांची मजुरी वेळेवर मिळणे, तसेच तालुक्यातील जामण्यापाडा, अर्थे खू, ऊमर्दा, हिवरखेडा येथील शासकीय आश्रमशाळांना पक्की इमारत करणे आदी मागण्यांचे निवेदनही देण्यात आले. 




शिरपूर तालुका आदिवासी बहुल आहे. भारताच्या इतिहासात आदिवासी समाजाचा वाटा आहे, परंतु तालुक्यात एकही आदिवासी क्रांतिकारक व क्रांतिवीरांचे स्मारक नाहीत; त्यांचे स्मारक होणे आवश्यक आहे. 

विलास पावरा अध्यक्ष बिरसा आर्मी.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने