जय जय गोपाला*... *देवकी नंदन गोपाला*... पत्रकार रणवीरसिंह राजपूत,ठाणे/नंदुरबार*



*जय जय गोपाला*...
*देवकी नंदन गोपाला*...

पत्रकार रणवीरसिंह राजपूत,ठाणे/नंदुरबार*

बंधू-भगिनींनो,श्रीकृष्ण जयंती म्हणजेच जन्माष्टमी,ज्यास हिंदू धर्मात आध्यात्मिकदृष्ट्या 
अनन्यसाधारण महत्व आहे.त्यास आपण गोकुळ अष्टमीदेखील म्हणतो.यासंदर्भात आख्यायिका अशी आहे की,श्रावण मासात रोहिणी नक्षत्रावर मथुरानगरीत कंसाच्या बंदिवासात *देवकी* च्या उदरी *बाळ श्रीकृष्ण* चा जन्म झाला अन् जणू दुष्ट-अत्याचारी, मानवसंहारी *कंस* या राक्षसाचा सर्वनाश करणारा देवअवतारी उदयास आला.

श्रीकृष्णाचा जन्म हा खऱ्या अर्थाने कंस मामाचा नाश ; शिशुपालचे शंभर अपराध माफ करून पुढे सुदर्शनचक्राने कृष्णाने त्याचा केलेला शिरच्छेद ; दौपद्री वस्त्रहरण रोकण्यासाठी तिला श्रीकृष्णाने दिलेला मदतीचा हात अन् महाभारतातील कौरवांच्या अहंकारी व जुलूमी साम्राज्याचा रणभूमीवर शेवट करण्यासाठी श्रीकृष्णाने अर्जुनाचा *सारथी* बनून बजावलेली अहम भूमिका या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे.

श्रीकृष्णाच्या जन्मासंदर्भात आणखी एक महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे मां *देवकी* च्या पोटी झालेला बाळ श्रीकृष्णचा जन्म आणि मां *यशोदा* ने केलेलं बाळ श्रीकृष्णचे पालनपोषण! या द्वय महान मातांनी *आई* या नात्याने बजावलेले पवित्र उत्तरदायित्व..आजही समस्त मातांना पथदर्शक ठरत आहे.आम्ही सर्वजण भगवान श्रीकृष्ण अन् देवकी-यशोदा या आदर्श मातांना आजच्या या मंगलमय दिनी दंडवत प्रणाम करतो.जय श्रीकृष्ण!

आज देशासह जगभरात जेथे जेथे हिंदूधर्मीय आहेत,ते सर्व मोठ्या धूमधडाक्यात *जन्माष्टमी* साजरी करतात.गोकुळ अष्टमीच्या दिवशी कृष्णभक्त हे उपवास करतात.या दिवशी 
हिंदुधर्मीय लोक भगवान श्रीकृष्णच्या मंदिरात जाऊन मुरलीधराच्या नावाने जागरण करत रात्री ठीक १२ वाजता मोठ्या हर्षोल्लासात श्रीकृष्ण जयंती जयघोषात साजरी करतात.याप्रसंगी *जय जय गोपाला..देवकी नंदन* *गोपाला..वासुदेव नंदन गोपाला.. नंद नंदन* *गोपाला..यशोदा नंदन गोपाला!* या नावाने भक्तजन गजर करत तल्लीन होऊन नाचत-गात असतात.या मंगलमय दिनी भक्तांच्या आनंदाला जणू उधाणच असलेले असते.काही भक्त तर श्रीकृष्णाची वेशभूषा करून नृत्यगान करून भक्तजनांची टाळ्याच्या कडकडाटाने दाद मिळवत असतात.अशाप्रकारे,नृत्य,
नाट्य,कथा,पुराण असे कार्यक्रम जागोजागी सादर होत असतात.वास्तवात हेच खरं हिंदू धर्माचं भगवं प्रतिक आहे.

या वर्षाची *गोकुळ अष्टमी* अन् *गोपाळकाला* हे उत्सव मोठ्या उत्साहात साजरे  होताहेत.मुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस,उपमुख्यमंत्री श्री.अजितदादा पवार यांच्या महायुती सरकारने दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या धुमधडाक्यात व मोकळ्या मनाने साजरा करण्याची गोविंदा पथकांना अनुमती दिली आहे.त्यामुळे गोविंदा पथकांना अत्यानंद झाला असून,त्यांच्या उत्साहाला पारावरच उरलेला नाही.

ठाणे,टेंभी नाका येथे वंदनीय धर्मवीर आनंदजी दिघे यांनी सुरू केलेल्या 
दहीहंडी कार्यक्रमाची परंपरा त्यांच्या स्मरणार्थ पुढे अशीच चालू राहणार आहेत. मुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा दहीहंडीचा कार्यक्रम येथे संपन्न होताहे. तरी ठाणेकरांनी यंदाच्या दहीहंडी कार्यक्रमात स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे,असे आवाहन करण्यात येते.

दहीहंडीच्या कार्यक्रमादरम्यान होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर गोविंदा पथकांच्या आयोजकांनी कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये,यासाठी खबरदारी घ्यावी,जेणेकरून दहीहंडी फोडताना कोणत्याही लहान-मोठ्या गोविंदाच्या जीवाला धोका पोहोचणार नाही.अवाजवी धांगडधिंगा न करता,गोविंदा पथकांनी
शिस्तबद्धपणे अन् भक्तिभावाने दहीहंडीचा सोहळा साजरा करावा. दहीहंडीसंदर्भात राज्य शासनाने घालून दिलेले नियम  गोविंदा पथकांनी काटेकोरपणे पाळावेत.त्यामुळे सणाचे पावित्र्य अबाधित रहाते अन् त्याला कुठलाही गालबोट लागत नाही.गोविंदा पथकांनी शेवटच्या थरावर असलेल्या छोट्या गोविंदाची विशेष काळजी घ्यावी.कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी गोविंदा पथकांनी पोलीस दलाला सर्वोतोपरी सहकार्य करावे.संयम,शिस्त व समन्वय ठेऊन दहीहंडी उत्सव साजरा करावा म्हणजे श्रीकृष्ण जयंती साजरी करणे आध्यात्मिकदृष्ट्या फलद्रूप होईल.जय श्रीकृष्ण!

*गोविंद,गोविंद हरे मुरारी*..
*हे नाथ नारायण वासुदेव*..


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने