*सलग दुसऱ्यांदा महिला जिल्हाधिकारी नियुक्त डॉ मिताली सेठी २०१७ बॅचच्या आयएएस अधिकारी*
नंदूरबार जिल्हाधिकारीपदी सलग
दुसऱ्या टर्ममध्ये महिला
जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे. मनीषा खत्री यांच्यानंतर मिताली सेठी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तत्कालीन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांची नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या महानगर आयुक्तपदी बदली झाली आहे. त्यांचा पदभार अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. सोमवारी राज्य शासनाने राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले. त्यात नंदुरबार जिल्हाधिकारीपदी नागपूर येथील वसंतराव नाईक राज्य कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (वनामती) च्या संचालक डॉ. मिताली सेठी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
डॉ. सेठी या २०१७ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. त्यांच्या आतापर्यंत पाच पोस्टिंग झाल्या आहेत. जुलै २०१८ ते एप्रिल २०१९ या काळात त्या अमरावती येथे सहायक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होत्या. त्यानंतर जुलै २०१९ ते ऑक्टोबर २०१९
या काळात दिल्ली येथे केंद्र सरकारचे असिस्टंट सेक्रेटरी म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर ऑक्टोबर २०१९ ते जुलै २०२१ या काळात त्या धारणी येथे सहायक जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, प्रकल्प अधिकारी या पदांवर कार्यरत होत्या. जुलै २०२१ ते नोव्हेंबर २०२२ या काळात चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी पदाची जबाबदारी त्यांनी पार पाडली आहे. त्यानंतर जानेवारी २०२३ पासून त्या नागपूर कार्यरत होत्या.
दरम्यान, १९९८ पासून आतापर्यंत जिल्ह्याला एकूण १५ जिल्हाधिकारी मिळाले असून त्यात दोन महिलांचा समावेश आहे. मनीषा खत्री यांच्यानंतर सलग दुसऱ्या टर्मला महिलाच जिल्हाधिकारी जिल्ह्याला मिळाल्या आहेत.
*दंत चिकित्सक...*
■ डॉ. मिताली सेठी यांनी मे २००९ ते जून २०१२ या काळात तामिळनाडू येथील शासकीय दंत महाविद्यालय आणि रुग्णालयात सिनिअर रेसिडेंट म्हणून सेवा केली आहे. ऑगस्ट २०१२ ते फेब्रुवारी २०१५ या काळात त्या चेन्नई येथील एसआरएम डेंटल कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत होत्या. फेब्रुवारी २०१५ ते ऑगस्ट २०१७ या काळात पाँडेचेरी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस येथे असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत होत्या.
