शिरपूर फर्स्ट च्या वतीने सोशल मीडियात टोल का झोल अभियानातून आंदोलन सुरू
खा.ॲड.गोवाल पाडवी यांनी गडकरींकडे शिरपूर व सोनगीर टोल नाका संदर्भात केली मागणी
शिरपूर फर्स्टच्या वतीने 'टोल का झोल' अभियानातुन शिरपूर व सोनगीर टोल नाक्याचे पोलखोल अभियान सुरू केले आहे. तर खा. ॲड.गोवाल पाडवी यांनी रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन शिरपूर व टोल नाक्याचा प्रश्न उपस्थित केला आहे. न्याय मिळत नाही तोपर्यंत शिरपूर व सोनगीर टोलनाक्याच्या संदर्भात सुरू असलेले आंदोलन असेच सुरू राहील असे शिरपूर फर्स्ट च्या वतीने सांगण्यात येत आहे.
शिरपूर टोलवर शिरपूरच्या स्थानिक वाहनधारकांना १००% टोल माफी असावी तसेच बेकायदेशीर असलेला सोनगीर टोल नाका बंद करावा ह्या मागण्या घेऊन शिरपूर फर्स्ट संघर्ष करत आहे. यात अधिकारी ते मंत्री सर्वांनाच अनेक वेळा निवेदन देण्यात आले.शिरपूर फर्स्ट च्या वतीने वाहनधारकांकडून हजारो अर्ज भरले,स्वाक्षरी मोहीम, ठिय्या आंदोलन, लोटांगण आंदोलन,कपडे काढून आंदोलन असे वेगवेगळे आंदोलन करण्यात आले. तरी शासनाच्या वतीने कार्यवाही होत नाही.
यातच आंदोलनाची सकारात्मकता म्हणजे नंदुरबार लोकसभेचे खा. ॲड.गोवाल पाडवी यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची दिनांक ८ ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष भेट घेतली. यात शिरपूर व सोनगीर टोल नाक्याचा प्रश्न त्यांच्या लक्षात आणून दिला.व या अन्यायकारक टोल वसुलीच्या संदर्भात न्याय देण्याची विनंती त्यांनी केली. सामान्य जनतेला लुटणाऱ्या या टोल संदर्भात आता खासदारांनीच मंत्र्यांकडे सदर मागणी पोहोचवल्याने मंत्री आता जनतेला न्याय देतात का ? याकडेही स्थानिक जनतेचे लक्ष लागले आहे. अन्यथा शासनाला सामान्य जनतेशी काही घेणेदेणे नाही हे हेही समोर येणार आहे.
मात्र शिरपूर फर्स्टचे आंदोलन येथे थांबणार नाही.आता शिरपूर फर्स्ट च्या वतीने सोशल मीडियावर 'टोल का झोल' नावाची मालिका सुरू केली आहे. यामाध्यमातून सुरू असलेला टोल चा झोल उघड करण्यात येत आहे. ज्या उड्डाणपूल मुळे शिरपूर टोल आकारला जातो त्या उड्डाणपूलची अवस्था काय आहे ? किती रक्कम लागली ? आणि काय सुविधा दिली ? असे प्रश्न घेऊन टोलची पोलखोल करण्यात येत आहे.
तसेच महामार्गावरील खड्डे, टोलचे शौचालय, टोल वर होणारी गर्दी अशा विविध मुद्द्यांवर रोज १ व्हिडिओ बनून प्रसारित करण्यात येत आहे.
सोशल मीडियातून जनतेचा आक्रोश आता वाढत आहे. लोक प्रत्यक्ष अप्रत्यक्ष शिरपूर फर्स्टच्या आंदोलनात सहभागी होत आहेत.व प्रचंड प्रतिसाद त्यांना मिळत आहे. यात टोल प्रशासनाकडून आंदोलनकर्त्यांवर दबाब टाकला जात आहे.खोट्या तक्रारी करण्याचा प्रकार सुरू आहे. पण शिरपूर फर्स्ट अनधिकृत टोल वसुली बंद होत नाही तो पर्यंत लढत राहील. असे शिरपूर फर्स्ट समन्वयक हंसराज चौधरी यांनी सांगितले.
इतका टोल भरून सुविधा मिळत नाही, महामार्गावर जीव घेणे खड्डे आहेत. उद्याला रस्त्यावर कोणाचा अपघात झाला, काही झालं तर याला सर्वस्वी जबाबदार टोल कंपनी, न्हाई आणि त्यांचे अधिकारी असतील. आता यापुढे नागरिकांनीही पुढे येऊन याचा शासनाला जाब विचारला पाहिजे.
- कल्पेश राजपूत, शिरपूर फर्स्ट समन्वयक




