*9 ऑगस्ट - विश्व आदिवासी दिवस*
दरवर्षी जगभरात ९ ऑगस्ट हा दिवस विश्व आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो.
• *आदिवासी म्हणजे काय?*
आदिवासी म्हणजे मूळ निवासी. आदिवासी शब्द दोन शब्दांनी मिळून बनलेला आहे.
आदि: पूर्वीपासून
वासी: वास्तव्य करणारा
*2024 ची थीम* : स्वैच्छिक स्थानिक आणि प्रारंभिक संपर्कात मुळ निवासी लोकांच्या हक्कांचे संरक्षण करणे.
• *९ ऑगस्ट विश्व आदिवासी दिवसाचा इतिहास:*
मुळ निवासींना मानवाधिकार अंमलात आणण्यासाठी व त्यांचे संरक्षण करण्यासाठी १९८२ साली UNO (संयुक्त राष्ट्र संघ) यांनी एक कार्यकारी UNWGIP ( United Nations Working Group on Indigenous Populations) उप आयोगाची निर्मिती केली. ज्याची पहिली बैठक ९ ऑगस्ट १९८२ साली झाली, प्रत्येक वर्षी ९ ऑगस्ट विश्व आदिवासी दिवस म्हणून साजरा करावे असे निर्देश UNO द्वारे देण्यात आले. पहिल्या बैठकीत ६८ देशांचे ४०० आदिवासी प्रतिनिधी उपस्थित होते. संयुक्त राष्ट्र संघ (UNO) च्या ३०० पानी घोषणा पत्रामध्ये ४० विषयावर चर्चा होऊन त्याचे चार विभाग करण्यात आले. त्यामध्ये तिसऱ्या भागांमध्ये रिओदि जानेरो (ब्राझील) येथे बैठकीतील विषयावर चर्चा होऊन प्रस्ताव मंजूर करण्यात आला. पृथ्वीवरील पर्यावरणाचा ऱ्हास थांबवणे साठी आदिवासी संस्कृती अंगिकारणे महत्त्वाचे आहे असे मत व्यक्त केले गेले. संयुक्त राष्ट्र संघामध्ये अमेरिका, चीन, फ्रान्स, भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, इटली, जपान असे एकूण १९३ देश सदस्य आहेत.
१९९३ साली UNWGIP कार्यकारिणीच्या ११ व्या अधिवेशनात मुळनिवासी घोषणेला मान्यता मिळाल्यानंतर १९९४ ला मुळनिवासी वर्ष व ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस म्हणून घोषित करण्यात आले. २१ डिसेंबर १९९४ ते २० डिसेंबर २००४ पर्यंत पहिले आदिवासी दशक म्हणून घोषित केले. त्यानंतर १६ डिसेंबर २००५ ते १५ डिसेंबर २०१४ पर्यंत दुसरे विश्व आदिवासी दशक म्हणून घोषित केले.
• *विश्व आदिवासी दिवस साजरा का केला जातो?*
UNO ने जाणले होते की, २१ व्या शतकातही जगातील विविध भागांत राहणारा आदिवासी समाज आजही बेरोजगारी, बाळ मजूरी, भेदभाव, उपेक्षा, स्थलांतर, अन्न, वस्त्र, निवारा, गरीबी, निरक्षरता, आरोग्य सुविधा, शैक्षणिक सुविधा, मोल मजुरी, सामाजिक विकास, आर्थिक प्रश्न, शैक्षणिक मागासलेपणा अशा प्रकारच्या समस्यांना सामोरं जात आहे.
संयुक्त राष्ट्र संघाने १३ सप्टेंबर २००७ रोजी ४६ कलमी आदिवासी अधिकार जाहिरनामा मंजूर करून युनोच्या आमसभेत प्रकाशित करण्यात आला.
आदिवासी समुदायाच्या मानवी अधिकाराचे संरक्षण व्हावे, संस्कृतीचे रक्षण करणे, त्यांचा जल-जंगल व जमिनीवरील अधिकार अबाधित राहावा, त्यांची विशिष्ट संस्कृती, ओळख, हक्क व अधिकाराची ओळख, सामाजिक ऐक्य, अस्तित्व, स्वाभिमान, आत्मसन्मान, अस्मिता, कायम राहावी यासाठी व्यापक जनजागृती आणि प्रयत्नांची आवश्यकता लक्षात घेऊन हा दिवस दरवर्षी विश्व आदिवासी दिवस म्हणून साजरा केला जातो.
• *कधी साजरा करण्यात आला पहिला विश्व आदिवासी दिवस?*
मुळ निवासी यांना हक्क मिळवून देण्यासाठी व त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी, भाषा, संस्कृती, इतिहास संरक्षणासाठी UNO (संयुक्त राष्ट्र संघ) ची महासभा द्वारा ९ ऑगस्ट १९९४ साली जेनेवा शहरात जगातील मुळ निवासी प्रतिनिधी यांच्या द्वारे जगातील प्रथम आंतरराष्ट्रीय विश्व आदिवासी दिवस संमेलनाचे आयोजन करण्यात आले. मुळ रहिवासी यांची संस्कृती, भाषा व त्यांचे हक्क अधिकारांना सगळ्यांनी एक मताने स्विकारले, व त्यांचे हक्क कायम राहतील याची खात्री करण्यात आली. संयुक्त राष्ट्र संघाने जगातील मुळ निवासींना वचन दिले की, “आम्ही तुमच्या सोबत आहोत”.
UNO (संयुक्त राष्ट्र संघ) च्या व्यापक चर्चेनंतर २१ डिसेंबर १९९४ पासून २० डिसेंबर २००४ पर्यंत प्रथम मुळ निवासी दशक व प्रत्येक वर्षी ९ ऑगस्ट ला (International day of the world's Indigenous People's) विश्व आदिवासी दिवस म्हणून साजरा करावयाचे ठरविले, तसे जगातील सगळ्या देशांना तसे निर्देश देण्यात आले. तेंव्हापासून संपूर्ण जगामध्ये ९ ऑगस्ट ला जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा केला जाऊ लागला.
• *भारताच्या इतिहासातील आदिवासी समाजाचा योगदान:*
भारतीय इतिहासात आदिवासी समाजाला अल्प प्रमाणात ओळख मिळालेली आहे. भारतातील १८५७ च्या अगोदरही अनेक उठाव झाले, ते उठाव आदिवासींनी केले होते. त्यात आदिवासी समाजांनी केलेल्या उठावाची माहिती इतिहासात मोजक्याच इतिहासकारांनी नमूद केले आहे. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी व समाज जनजागृती साठी आदिवासी क्रांतिकारकांनी योगदान दिलेले आहे. ज्या ज्या वेळी आदिवासी जमातीचे स्वातंत्र्य, संस्कृती, अस्मिता, जल, जंगल, जमीन धोक्यात आली त्यावेळी उठाव केले. आदिवासी समाजातील अनेक लोकांनी आत्मसन्मानाच्या चळवळी उभ्या केल्या, काहींनी प्रबोधन केले तर काही आदिवासी क्रांतिकारकांनी इंग्रजाविरुद्ध, शोषणाविरुद्ध, विषमतेविरुद्ध, अन्यायाविरुद्ध लढे उभे केले.
इंग्रजांना सर्वप्रथम भारतातील आदिवासी जमातींशी लढा द्यावा लागला. इंग्रजांविरुद्ध झालेल्या वेगवेगळ्या आंदोलन व लढ्यामध्ये जननायक बिरसा मुंडा, रॉबिन हूड तंट्या भिल, खाज्या नाईक, भीमा नाईक, बाबुराव शेडमाके, महाराणी दुर्गावती, तिलका मांजी, राजा कुंवर सिंह वसावा, ठाणेदार दिल्या पाडवी, नाग्या कातकरी, भीमा नाईक, तीर्थसिंह बुधु बगत, झलकारीबाई, बाबुराव शेडमाके, झुंजार नाईक, भागोजी नाईक, रामा किरवा, गोविंद गोरे, उमाजी नाईक, कुंवर वसावा, राघोजी भांगरे, समशेर सिंह पारधी, होण्या केंगले, भगीर बाबा, गुलाब नाईक, जोरिया भगत, नाना भगत, शंभूदास कचारी, देवानी नाईक, गुमानसिंग नाईक आदी क्रांतिकारकांचे योगदान आदिवासी समाजासाठी महत्त्वाचे प्रेरणादायक व स्फूर्तिदायक आहे. स्वातंत्र्यलढ्यासाठी व समाज जनजागृती साठी आदिवासी क्रांतिकारकांनी योगदान दिलेले आहे. इतिहासात याची ओळख अल्पप्रमाणात आलेली आहे.
• *आदिवासींचे उठाव/आंदोलन:*
इंग्रजांविरुद्ध भिल्लांचा उठाव, संथालांचा उठाव, मुंडा उठाव, कच्छचा उठाव, पहाडी आंदोलन, चुवार आंदोलन, गोंड आंदोलन, कोल आंदोलन, सरदार मुंडा आंदोलन.
*संकलन* :
विलास पावरा, सामाजिक कार्यकर्ता
9168159576
