शिरपूरच्या अवैध सावकाराला अटक; शेतकऱ्याची सव्वाकोटी रुपयांना लूट; धुळे आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई




शिरपूरच्या अवैध सावकाराला अटक; शेतकऱ्याची सव्वाकोटी रुपयांना लूट; धुळे आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई


शिरपूर प्रतिनिधी - 
 शिरपूर तालुक्यात सावकारी करून फसवणूक करत शेतकऱ्याची सव्वा कोटी रुपयांची लूट करणाऱ्या आरोपी सावकारा विरोधात शहर पोलीस ठाण्यात तक्रार झाल्यानंतर या गुन्ह्याची गंभीरता पाहत धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी या गुन्ह्याच्या तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला आणि धुळे आर्थिक गुन्हे शाखेने शिरपूर मधून आरोपीस अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.

शिरपूर येथील शेतकऱ्याची सव्वाकोटीहून अधिक रकमेची आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार शिरपूर शहर पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली होती. या प्रकरणातील अवैध सावकारास आर्थिक गुन्हे नियंत्रण शाखेने सोमवारी (ता. १५) अटक केली. संदीप प्रेमसिंग राजपूत (जमादार)असे अवैध सावकाराचे नाव आहे.

त्याने शिरपूर शहरासह परिसरातील अनेकांना व्याजाने पैसे देत त्यांची शेती, जमीन व प्लॉट स्वतः तसेच इतरांच्या नावे केल्याचे तपासातून समोर आले  आहे.

फिर्यादी अजितसिंग नवनीतसिंग राजपूत (वय ६३, रा. रथगल्ली, शिरपूर) या शेतकऱ्याने कंपवाताच्या आजारावर उपचारासाठी अवैध सावकार संदीप प्रेमसिंग जमादार (राजपूत, वय ४१, रा. प्लॉट क्रमांक ७, सिद्धी विनायक कॉलनी, शिरपूर) याच्याकडून मार्च. २०१७ मध्ये ३० लाख रुपये व्याजाने घेतले.

याबाबत आपसात समजुतीचा लेख करून घेतला. तीस लाखांच्या मोबदल्यात अजितसिंग राजपूत यांची शिरपूर शिवारातील सर्वे क्रमांक ३५/२ क्षेत्र १ हेक्टर २१ आर, शिवाय ०.४१ आर, तसेच ०.२७ आर, अशी ९० लाख ५३ हजार किमतीची शेती सावकाराच्या नावे करून दिली.

शेती सोडविण्यासाठी त्याला वेळोवेळी एक कोटी २१ लाख सहा हजार रुपये रोख, तसेच १६ लाख ६४ हजार २०० रुपये रोख, असे व्याजासह एकूण एक कोटी ३७ लाख ७० हजार २०० रुपये संशयित जमादार याला रोख स्वरूपात परत केले. तरीही तो आणखी पैशांची मागणी करत होता.

'पैसे दिले नाही तर तुला व तुझ्या मुलाला शिरपूरमध्ये जिवंत राहू देणार नाही. तुम्हाला मारून टाकू व तंगड्या तोडून टाकू', अशी धमकी देत होता असा आरोप तक्रारदार यांनी केला आहे. त्यास अजितसिंग राजपूत हिशेब समजवण्यासाठी गेले असता तो शिवीगाळ करीत अंगावर येतो, धक्काबुक्की करतो, गायब करून टाकू, अशी धमकी देऊन पिळवणूक करीत आहे असे देखील त्यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. त्यामुळे त्याने तक्रारदार अजितसिंग राजपूत यांची शेती परत न करता आर्थिक फसवणूक केली, अशी तक्रार झाल्याने सावकार संदीप जमादार याच्यावर शिरपूर शहर पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला. 

आता या गुन्ह्याच्या आधारे आर्थिक गुन्हे शाखेकडून सखोल तपास सुरू असून संबंधित आरोपीने अजून इतर कोणाचे फसवणूक केली आहे का किंवा व्याजाने व्यवहार केले आहेत का? याच्या शोध घेतला जात आहे. 

 शिवाय इतक्या मोठ्या प्रमाणात रक्कम व्याजाने देण्यासाठी पैसे कुठून आले? त्याच्या सोर्स काय? याव्यतिरिक्त आरोपीचे इतर कोणते कोणते व्यवसाय आहेत? तालुक्यात व तालुक्याचे बाहेर किती प्रमाणात प्रॉपर्टीज आहेत? आरोपीने इतकी माया कशी जमवली? इत्यादी बाबत आता या गुन्ह्यासोबत सखोल चौकशी पोलिसांकडून केले जात आहे. या आरोपीच्या विरोधात शिरपूर तालुक्यात इतरही काही गुन्हे दाखल आहेत का? याचा देखील शोध घेतला जात आहे. 


दरम्यान संबंधित आरोपीकडे कोणत्याही प्रकारचे सावकारीचे लायसन्स नसून सदरच्या व्यवहार हा अवैध सावकारीतून झाला असल्याची बाब देखील चौकशीत समोर आली आहे .

यानंतर आता इतर तक्रारदार देखील समोर आले असून त्यांच्या आरोपानंतर या आरोपी वरील गुन्ह्यात वाढ होण्याची शक्यता आहे. या गुन्ह्यात अजून काही तक्रारदार समोर आले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक धुळे यांनी दिली आहे.

दरम्यान आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्यास दोन दिवसांची पोलीस कस्टडी मिळाली होती.

जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार घूसर, अमोल देवढे, हिरालाल ठाकरे, गयासुद्दिन शेख, श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाणे, गणेश खैरनार, विलास पाटील यांनी ही कारवाई केली.



Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने