शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील साई मंदिरास तीस वर्षे पूर्ण,
साई भक्तांचे श्रद्धास्थान म्हणून निर्माण झाली नवी ओळख
शिरपूर प्रतिनिधी - संपूर्ण देशात तसेच महाराष्ट्रात शिर्डीच्या साईबाबांची आघात अशी महिमा असून राज्यात व देशात करोडो भाविक साईबाबांना मानणारा वर्ग आहे. मागील काही वर्षांपासून साई भक्तांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.
शिरपूर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापारी असोसिएशन यांनी एक छोटे साई मंदिर साकारले होते. त्यात दिवसेंदिवस वाढ होऊन भक्तांच्या मदतीने आता भव्य दिव्य आणि प्रशस्त असे साई मंदिर उभे राहिले आहे.
दिनांक 12 मे 2024 रोजी सदरच्या मंदिर स्थापनेला तिथीनुसार तीस वर्षे पूर्ण झाली आहेत. अशी माहिती साई भक्तांकडून प्राप्त झाली आहे.
या तीस वर्षाच्या काळात शहरातील साईभक्त नित्यनेमाने दररोज साई मंदिराला भेट देत असतात. दररोज येथे आरती व महापूजा केली जाते. अनेक भाविक येथे भंडाऱ्याचे आयोजन करत असतात. दर गुरुवारी येथे भंडाऱ्याचे आयोजन केलेले असते त्यातून गोरगरिबांना मोफत अन्नदान केले जाते. मागील काही वर्षात साई भक्तांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली असून साईंच्या कृपेने आपली मनोकामना पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी मनोकामना पूर्ण करण्यासाठी विविध देणगी व भंडार्यांचे आयोजन केले जाते. अनेक दानशूर व्यक्तिमत्व नेहमी या मंदिराला दान करत असतात. त्यामुळे शहरातील एक प्रमुख श्रद्धा स्थान म्हणून हे मंदिर उदयास आले आहे. सदरच्या मंदिरावर रघुनाथ महाराज हे आपली सेवा देत असतात. दर गुरुवारी या मंदिरावर प्रचंड अशी भक्तांची रीघ लागलेली असते. ज्या भक्तांना शिर्डी येथे जाऊन दर्शन घेणे शक्य नाही असे अनेक भक्त या मंदिरावर भेट देऊन आपली मनोकामना सिद्ध करतात. या ठिकाणी अनेक वेळा धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. अनेक भाविक साईंची दिंडी देखील या मंदिरापासून सुरुवात करून काढत असतात. या मंदिरात दर्शन घेऊन काही क्षण व्यतीत केल्यानंतर विलक्षण आत्म शांतीचा व अध्यात्मिक शांतीचा अनुभव होतो अशी भावना साई भक्त नेहमीच व्यक्त करतात.
आणि म्हणून भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिराला तीस वर्षे पूर्ण झाल्याने साई भक्तांकडून आनंद व्यक्त केला जात आहे. त्यामुळे ज्या ज्या भाविकांनी या मंदिरासाठी सगळ्या हाताने मदत केली अशा सर्व ज्ञात अज्ञात भाविकांचे विश्वस्त मंडळाकडून आभार व्यक्त करण्यात आले आहेत.
साईबाबांच्या प्रमुख मंत्र श्रद्धा आणि सबुरी यात विलक्षण अशी ताकद असून स्वच्छ व पवित्र मनाने साईबाबांची पूजा अर्चा आणि मनोभावी सेवा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी भावना साईभक्त राकेश देशमुख आमोदा तालुका शिरपूर जिल्हा धुळे यांनी व्यक्त केली आहे. आणि या मंदिराला तीस वर्षे पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी निर्भीड विचार न्यूज शी बोलताना दिली आहे.


