निवडणुकीसाठी उमेदवाराने स्वतंत्र बँक खाते उघडणे अनिवार्य
धुळे - लोकसभा निवडणुकीत विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडून होणारा वारेमाप खर्च बघता त्यावर नियंत्रण आणण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला खास निवडणुकीसाठी कुठल्याही बँकेत स्वतंत्र खाते उघडावे लागणार आहे.
तसे केंद्रीय निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत.
निवडणुकीत मोठ्या प्रमाणात विविध राजकीय पक्ष वेगवेगळया कारणावर खर्च होत असला तरी अनेकदा त्याची कुठेही नोंद होत नाही. या संदर्भात निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार आता प्रत्येक राजकीय पक्षाच्या आणि अपक्ष उमेदवारांना निवडणूक खर्चासाठी कुठल्याही राष्ट्रीयीकृत बँक, सहकारी बँक, टपाल खाते आदी ठिकाणी स्वतंत्र खाते उघडणे आवश्यक आहे.
नामांकन अर्ज भरताना बँक खात्याची माहिती देणे बंधनकारक आहे. या खात्यातून उमेदवारांना प्रचारासाठी खर्च करावा लागणार आहे. देणी धनादेशाद्वारे करावे लागणार आहे. दर आठ दिवसांनी निवडणूक अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार संबंधित उमेदवारांचा खर्चाचा तपशील बँककडून घेण्यात येईल आणि नोंद त्यांच्याकडे राहील.
लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवाराला ९५ लाख रुपयांची खर्चाची मर्यादा देण्यात आली आहे. प्रचारासाठी लागणाऱ्या खर्चासाठी दरही ठरवून देण्यात आले आहेत. त्यानुसार उमेदवाराला खर्च सादर करावा लागणार आहे. या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी आयोगाने पथकही नियुक्त केले आहे.
