शिरपूर तालुक्यात कृषी विक्रेत्यांची रासायनिक खतांची लिंकिंग व दोंडाईचा रॅक पॉइंट बाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
थाळनेर ( प्रतिनिधी) शिरपूर तालुक्यात रासायनिक खत कंपन्यांकडून मनमानी पद्धतीने होणाऱ्या लिंकिंग बाबत व दोंडाईचा रॅक पॉईंट वरील ठेकेदार कडून होणाऱ्या लूट बाबत चौकशी करून कारवाईची मागणी शिरपूर तालुका कृषी विक्रेता संघटने कडून जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रारद्वारे करण्यात आली आहे. याबाबत थोडक्यात वृत्त असे की शासनाच्या धोरणानुसार तालुक्यातील कृषी विक्रेते नॅनो युरियाची विक्री करत आहेत. परंतु रासायनिक खत कंपन्या याचा गैरफादा घेत निमकोटेड युरिया सोबत इतर खते, किटकनाशके, सेकंडरी खते (मॅग्नेशियम, झिंक) आदींची लिंकिंग करत आहेत. तसेच गेल्या चार महिन्यांपासून शेतकऱ्यांकडून रासायनिक खतांची मागणी खूपच कमी झाली आहे. तरी देखील काही रासायनिक खत कंपन्या मनमानी करत आहेत. सदर कंपन्या जेवढ्या किमतीचा निमकोटेड युरिया घेणार तेवढाच लिंकिंगचे मटेरियल घेण्यास सकती करीत आहेत.
तसेच दोंडाईचा रॅक पॉईंट वरून येणाऱ्या एक्स रासायनिक खताच्या गाडीना अव्वाच्या सव्वा भाडे लावले जात आहे. त्यामुळे रासायनिक खत छापील किमती पेक्षा महाग पडत आहेत. तसेच दोंडाईचा रॅक पॉईंट वरील ठेकेदार मुजोर झाले आहेत. सदर ठेकेदार हुकच्या नावाखाली प्रत्येक बॅगेतून १/२ किलो खतांची चोरी करत आहेत. सदर खत नंतर विक्री केले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी वजनाची खते मिळत आहेत.
जिल्ह्यात रॅकवर जेवढा रासायनिक खतांचा माल येतो तेवढीच ऑर्डर घेण्यात यावी त्यापेक्षा जास्तीची ऑर्डर घेऊन काळाबाजार केला जातो. जिल्ह्यात दर महिन्यात येणाऱ्या रासायनिक खतांच्या रॅकची वितरण बाबत माहिती ग्रामीण भागातील कृषी विक्रेते यांनाही पारदर्शकपणे देण्यात यावी. अशी लेखी तक्रार करण्यात आली आहे.
मा जिल्हाधिकारी महोदय यांचे अध्यक्षतेखाली धुळे जिल्ह्याची कृषि निविष्ठा सनियंत्रण सभा दिनांक 27/04/2024 संपन्न झाली. सभेत जिल्हाधिकारी यांनी लिंकिंगबाबत व इतर विषयावर चर्चा करून संबंधित मुजोर ठेकेदारांवर कायदेशीर कारवाईचे आदेश दिले.
