शिरपूर येथे सिने अभिनेता किरण माने यांची भेट घेऊन मालिका चित्रपट विषयी चर्चा केली.
प्रखर वक्ता ते उत्तम अभिनेता -किरण माने
सातारचा बच्चन म्हणून संबोधले जाणारे सिने अभिनेते किरण माने यांनी सांगितले नाटकातील अनुभव.
मुलगी झाली हो , मराठी बिग बॉस ते सिंधुताई माझी माई, असा नाट्य मय प्रवास )
मायनीसारख्या खेडेगांवातनं काॅलेजला सातार्यात आलोवतो. 'नाटका'त काम करायची लै इच्छा. काॅलेजच्या गॅदरींगमध्ये नाटक व्हायचं. त्यात भुमिका मिळवण्यासाठी ऑडीशन्स होत्या. रांग लागलीवती. सातार्यातला एक मोठ्ठा डायरेक्टर समद्यांच्या टेस्ट घेत होता. माझा नंबर आला...
मला काही डायलाॅग वाचायला दिले.. पयलंच वाक्य "हे बघ मी रंगीत टी.व्ही घेतला. आता तू ही घेणार असशील घरी जाऊन लगेच, रंगीत टी.व्ही." मी सुरुवात केली.. पहीलं वाक्य नीट म्हन्लं...पन त्यानंतर म्हन्लं - "आता तू बी घेनार आच्चील घरी जाऊन लगीच रंगीत टी.व्ही." डायरेक्टर भडाकलाच. म्हन्ला "अरे हा 'आनीपानी' वाला कुणी आणला धरुन? नांव काय तुझं?" म्हन्लं "किरन माने" त्यो हसला. म्हन्ला, "वाटलंच. मराठी प्रमाणभाषा बोलायला शिक आधी नीट. मग ये ॲक्टिंग करायला."
.अशा पद्धतीनं पयला सनसनीत अपमान झाला. दोस्ताला म्हन्लं "आयला ही प्रमानभाषा काय भानगडय." त्यो म्हन्ला "पिंजरा पिच्चरमधी मास्तरचा रोल करनारा शिरराम लागू बोलतो ती भाषा." म्हन्लं सोपंय की मंग. शिकूनच घिवूया ह्येज्यायला...नाटकासाटी कायपन !
नंतर लै लै लै कष्ट घिवून एकेका शब्दावर मेहनत घेत शिकलो एकदाची. पेपरातल्या बातम्यांपासून, मराठीच्या पुस्तकातल्या कविता, संस्कृत श्लोक असं सगळं घिवून चारभिंतीच्या डोंगरावर-अजिंक्यतारा किल्ल्यावर जायचो.. आन् मोठमोठ्या आवाजात वाचायचो.. एकेक शब्द सुटा करत प्रचंड मोठ्या आवाजात ओरडून उच्चार शिकलो...(नंतर त्याच तावातावात उर्दूबी शिकलो.) तिथं गुरं राखायला आलेले गुराखी तंबाखू चोळत-चोळत माझी मज्जा बघत हसायचे. त्यांच्याशी दोस्ती झाल्यावर मी त्यांना संस्कृत श्लोक शिकवायचा प्रयत्न केला..मग त्यांनी मला तंबाखू खायला शिकवायचा प्रयत्न केला.. ;-) असो.
..ही मेहनत घिवून या 'प्रमाणभाषेचा' अस्सा काय फडशा पाडला की नंतर नाटकात काम करताना 'भाषेचा मक्ता' घेतलेले भलेभले गारद केले..चितपट ! पण नंतर माझ्या लक्षात यायला लागलं की नाटक जरी कोल्हापूरात - मिरजेत किंवा अमरावतीत घडत असलं तरी सगळी पात्रं एकाच 'प्रमाणभाषेत' का बोलतायत?? नाटकातल्या पात्राचं आडनांव शिंदे,कांबळे किंवा कदम असलं तरी त्याच्या उच्चारांवर प्रमाणभाषेची सक्ती का??? आणि हे ही लक्षात आलं की मराठीत.. मुख्य करुन नाटकात.. अनेक मोठमोठे नट, दिग्गज नट केवळ 'शुद्ध वाचा' - 'सो काॅल्ड' स्वच्छ उच्चार यावरच वर्षानुवर्ष टिकून आहेत... भुमिकेचा अभ्यास-कॅरॅक्टरायजेशन-देहबोली-भावभावना व्यक्त करण्याची पद्धत या सगळ्याला फाटा देऊन फक्त गोड चेहरा करुन गुळमट प्रमाणभाषेत बोलत हसणारा-रडणारा-चिडणारा नट म्हणजे 'चांगला नट' अशी काहीतरी विचीत्र परंपरा मराठीत रूढ झाली होती.
...एकदा दूबेजींशी बोललो. ते म्हणाले "हे बघ जिथं भुमिकेची गरज आहे तिथं तुला प्रमाणभाषेत बोलता यायलाच हवं. त्यामुळे ती शिकणं आवश्यक आहे. पण तुझे रूटस् विसरू नकोस. हे शिकल्याचा तुला फायदा असा होईल की तुझ्या बोलीभाषेतली गंमत तुला कळेल-सौंदर्यस्थळं सापडतील-बारकावे समजतील. तू साकारत असलेलं कॅरॅक्टर ज्या परीसरातलं आहे तिथली बोली तुला उचलता येणं सोपं होईल."
याचा फायदा असा झाला की 'श्री तशी सौ' नाटकात मी मराठी कविता शिकवणारा प्राध्यापक पटवर्धन ही भुमिकाही प्रमाणभाषेच्या सौंदर्यांसह करू शकलो... 'वाडा चिरेबंदी' नाटकातला पराग आणि 'माझ्या नवर्याची बायको' या सिरीयलमधला शिरीषदादा साकारताना वैदर्भीय-नागपूरी बोलीत बोलू शकलो... मज्जा आली...इतकी की 'माझ्या नवर्याची बायको' सिरीयल जोरात सुरू असताना नागपूरातले कित्येक लोक मला "हा तं आपल्या नागपुरचाय नं बाप्पाS", असं म्हणत मला आपुलकीनं भेटायला यायचे. तर 'परफेक्ट मिसमॅच', 'गोविंद घ्या गोपाळ घ्या' ही नाटकं आणि सध्या सुरू असलेली 'मुलगी झाली हो' ही सिरीयल यात माझी स्वत:ची अस्सल सातारी बोली बोलण्याची संधी मिळाली !!!
...आता मला जाणवतंय की बोलताना 'प्रमाणभाषा' वगैरे असं काही नसतं. प्रत्येकाची आपल्या विभागाची बोली असते. पुण्यातल्या बर्याच जणांचा असा गैरसमज आहे की आम्ही उच्चार स्वच्छ-शुद्ध करतो म्हणजे आम्ही प्रमाणभाषेत बोलतो... पण त्यांच्यात 'पुणेरी लहेजा' असतो हे त्यांना कळत नाही. स्वच्छ शुद्ध बोलणारा पुण्याचा माणूस - शुद्ध बोलणारा सांगलीचा माणूस आणि स्वच्छ उच्चार करणारा नागपूरचा माणूस यांच्या बोलीत - लहेजात सुक्ष्म फरक असतो... असं सगळं नटानं समजून आणि उमजून केलं तर 'बहार' येते ! असो. लै ग्यान पाजळलं. बास आता.
प्रत्येकानं आपापल्या पद्धतीनं व्यक्त व्हावं... भावना पोचल्याशी मतलब... लिहीतानाच्या प्रमाणभाषेवर राग नाही. व्याकरणाच्या नियमांवरही राग नाही. भाषेची विनाकारण मोडतोड नको हे ही खरं. अर्थ बदलू नये ही खबरदारी अत्यावश्यकच.. पण बोलताना सगळीकडं-सतत 'प्रमाणभाषा' वापरून व्यक्त होण्यात 'अळणीपणा' येतो, 'बोली'चा तडका हवाच !! मी जिथं भुमिकेची गरज आहे तिथं , तेवढ्यापुरती 'परफेक्ट' बिनचूक प्रमाणभाषा बोलतो... बाहेर रिहर्सलला,सेटवर गप्पा मारताना सातारी बोलीशिवाय मला बोलता येत नाय... फुडं कुनीबी भाषेतला 'गामा' असो आपुन आपल्याच सातारीतच बोलतो.. नादखुळा ! जै सातारा-जै कोल्लापूर-जै पच्चीम महाराष्ट्र-जै विदर्भ-जै मराठवाडा-जै खान्देश-जै कोकन... जै मर्हाटी.. जय महाराष्ट्र !!
- किरण माने .( सिने अभिनेते व लेखक)
संकलन - सुनील शंकर सोनार
( शिरपूर जि.धुळे )
Tags
news
