*आरोही पावराच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या डाॅक्टर व नर्सच्या चौकशीचे जिल्हाधिकारींचे आदेश*
*बिरसा फायटर्सच्या निवेदनाची दखल*
नंदूरबार:ग्रामीण रूग्णालय धडगाव येथे आरोही अजित पावरा वय १० महिने या बालिकेला मुदतबाह्य (एक्स्पायर) सलाईन लावल्याने मृत्यूस कारणीभूत असलेल्या संबंधित डाॅक्टर व नर्सला तात्काळ सेवेतून निलंबित करा,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली.निवेदनाची तात्काळ दखल घेत जिल्हाधिकारी यांनी चौकशीचे आदेश जिल्हा परिषद नंदूरबारला दिले आहे. यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे,जिल्हा प्रसिद्धीप्रमुख जालिंदर पावरा,गोपाल भंडारी,करण सुळे,धनायुष भंडारी,पवन सुळे,रमेश पटले,रवींद्र नावडे,भावसार मोते, चिका भोसले, धना ठाकरे,रायमल पवार, करण पटले,भाईदास चव्हाण, मांगीलाल पावरा,शशिकांत पावरा,दिलवरसिंग पाडवी,हारसिंग भील, फेंदा वळवी,फुलसिंग वळवी आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
आरोही अजित पावरा वय - १० महिने रा.राडीकलम ता.धडगाव जि.नंदुरबार या बालिकेचा ग्रामीण रूग्णालय धडगाव येथे दिनांक ८ फेब्रुवारी २०२४ रोजी औषधोपचार घेत असताना रूग्णालयातील डाॅक्टर व नर्सने मुदतबाह्य (एक्स्पायर ) सलाईन लावल्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे.आरोही पावरा ह्या बालिकेला मुदतबाह्य सलाईन लावल्यानंतर त्याचा दुष्परिणाम होऊन उलट्या झाल्या,तिचे शरीरातील रक्त गट्ट झाले.शिवाय डोक्यात खड्डा पडला. मुदतबाह्य सलाईन लावल्याचे दुष्परिणाम लक्षात येताच धडगांव येथील डाॅक्टरांनी नंदूरबार सरकारी रूग्णालयात पेशंटला पाठवले.तरीही बालिकेच्या शरीरात बुदतबाह्य सलाईनचे विष पसरल्यामुळे जीव गेला.डाॅक्टर व नर्सच्या हलगर्जीपणामुळे बालिकेचा मृत्यू झाला आहे.तरी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, ग्रामीण रूग्णालय धडगांव येथील दिनांक ८ फेब्रुवारी २०२४ रोजीचे सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात यावेत. बालिकेच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या डाॅक्टर व नर्सला तात्काळ सेवेतून निलंबित करण्यात यावे.हीच नम्र विनंती.अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून जिल्हा स्तरावर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, याची नोंद घ्यावी.असा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून जिल्हा प्रशासनास देण्यात आलेला आहे.
