खबरदार ..आपल्या वाहनाला नंबर आहे ना?
फॅन्सी नंबर प्लेट आणि वाहन नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई चां बडगा
शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर शहर पोलीस स्टेशन कडून शहरातील बेशिस्त वाहन चालक, वाहनांवर नंबर प्लेट नसणे अथवा फॅन्सी नावे टाकणे, कागदपत्र न बाळगणे, ओव्हर शीट अशा प्रकारच्या वाहन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आता शहर पोलिसांनी कारवाईच्या बडगा उगारला आहे. शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक केके पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर विविध स्तरावर नागरिकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न या निमित्ताने होत आहे.
पोलिसांना असे निदर्शनास आले होते की बरेच मोटार सायकल चालक हे आपल्या वाहनाला RTO नियमाप्रमाणे नंबर प्लेट लावुन वाहन न चालवता किंवा नंबर प्लेटवर नंबर न टाकता त्यावर कोणत्या तरी ग्रुपचे नाव किंवा भाऊ दादा मामा असे फॅन्सी अक्षरात मजकुर लिहुन किंवा नंबर प्लेट नसलेली वाहने चालवितात. तसेच बरेच मोटार सायकल हे आपल्या मोटार सायकलवर क्षमतेपेक्षा जास्त ३ सीट किंवा ४ सीट बसवुन भरधाव वेगाने वाहने चालवितात. त्यामुळे बऱ्याच वेळा गंभीर स्वरूपाचे अपघात होवुन त्यामध्ये एखाद्या निष्पाप व्यक्तीचा जीव देखील जावु शकतो तसेच महिला व मुलींसदर्भातील गुन्हे करणाऱ्या आरोपीच्या मोटार सायकलचा देखील शोध घेणे शक्य होत नाही.
म्हणून शहर पोलिसांनी अशा प्रकारच्या वाहनांवर कारवाईला सुरुवात केली असून काही वाहनांवर दंडात्मक कारवाई देखील केली आहे.
तरी शिरपूर शहर व तालुक्यातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, सर्वांनी आपल्या वाहनांना RTO नियमाप्रमाणे नंबर प्लेट बसवुन घ्याव्यात तसेच वाहनाची कागदपत्रे व वाहन चालविण्याचा परवाना सोबत ठेवावा व मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी अन्यथा अशाप्रकारच्या वाहन चालकांविरूध्द कठोर कारवाई करण्यात येईल. याची सर्वांनी नोंद घ्यावी असे आवाहन पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी केले आहे.
