धुळे जिल्ह्यात महिनाभरात ४४ छापे; २२ ठिकाणी दुधात भेसळ,
धुळे: दूध भेसळ रोखण्यासाठी स्थापन केलेल्या जिल्हास्तरीय समितीने महिनाभरात ४४ ठिकाणी छापे टाकले. त्यापैकी २२ ठिकाणी दुधात भेसळ आढळली. पशुसंवर्धन,दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विकास विभागाचे प्रधान सचिव तुकाराम मुंडे यांनी या कारवाईचे कौतुक केले आहे. दुग्ध व्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे यांनी राज्यातील समित्यांनी केलेल्या कार्यवाहीचा नुकताच ऑनलाईन बैठकीद्वारे आढावा घेतला.
यावेळी धुळे जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण यांनी माहिती दिली. खासगी दूध डेअरी, दूध विक्री करणारे फेरीवाले, विक्रेते यांच्याकडील दुधाची तपासणी करण्यात आली.भेसळ आढळलेले जवळपास १५०० लिटर दूध समितीने जागीच नष्ट केल्याचे त्यांनी सांगितले.
ऑनलाइन बैठकीला जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी डॉ. अमित पाटील, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. आर. एम. शिंदे, अन्न सुरक्षा अधिकारी के. एच. बाविस्कर, वैधमापन शास्त्र निरीक्षक संतोष दलाल, सहायक जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी व्ही. व्ही. गरुड, दुग्धशाळा व्यवस्थापक सतिलाल बोरसे, प्रीतेश गोंधळी, मुकेश तमायचेकर, कृष्णा नेरकर उपस्थित होते.
