नारळीपौर्णिमा *खऱ्या प्रेमाचे.. बंध राखीचे* ✍️ *पत्रकार रणवीर राजपूत* *गवर्नमेंट मीडिया,महाराष्ट्र शासन,मंत्रालय*

नारळीपौर्णिमा

*खऱ्या प्रेमाचे.. बंध राखीचे* 

✍️ *पत्रकार रणवीर राजपूत*

*गवर्नमेंट मीडिया,महाराष्ट्र शासन,मंत्रालय*



भारतीय संस्कृतीत *रक्षाबंधन* या सणाला भाऊ-बहिणीतल्या अटूट प्रेमाचं प्रतिक म्हटलं जातं.श्रावणमासात येणाऱ्या राखी पौर्णिमेची बहीण-भाऊला चातक पक्षासारखी प्रतिक्षा असते.इतकेच नव्हे तर,कोळी -आगरी समाजातील बंधू -भगिनीदेखील नारळी पौर्णिमेची आतुरतेने वाट पाहत असतात.या मंगलमय दिनी मासेमारीआधी कोळी लोक आपल्या बोटींची मनोभावे पूजाअर्चा करत,समुद्रदेवतेची नारळ फुले वाहून सुखद जलमय प्रवासासाठी आराधना करतात.या दिनी कोळी -आगरी समाजाच्या लोकांच्या आनंदाला जणू उधाणच आलेले असते.कोळी भगिनी 

सातवारी/नऊवारी साड्या नेसून, नाकात नथ तर अंगावर दागदागिने घालून मोठ्या थाटामाटात नारळी पौर्णिमा साजरी करत असतात.याशिवाय त्या नाचत गात सागराकडे कूच करत असतात.सूर्यास्तापूर्वी सागरास कळस,नारळ अर्पण करून...*दर्या सागरा,तू आमच्या नारळाची पूजा स्वीकार कर अन् आमची बोट समुद्रात सुखरूप राहू दे अन् आम्हाला सुखी अन् समृध्द ठेव* असे साकडे घालतात.तथापि,त्यांचा एक प्रण असतो,एकदा की समुद्रात जाळ भिरकावलं,मग कुठल्याही परिस्थितीत माघार नाही.वास्तवात प्रत्येक कोळी बांधवात सागराच्या लाटांना सामोरे जाण्याची जन्मजात क्षमता असते.त्यांची अथांग सागर अन् त्याच्या लाटांशी अतूट बांधिलकी असते.अत: कोळी-आगरी बंधूभगिनींना नारळी पौर्णिमेनिमित्त हार्दिक शुभेच्छा!

रक्षाबंधनाच्या मंगलमय प्रसंगी बहीण ही 

भाऊरायाला अपार श्रद्धेपोटी ओवाळत,त्याचं पेढा भरवून तोंड गोड करते.त्यानंतर त्याच्या मनगटावर राखी बांधून त्याच्या समृद्धीसाठी अन् उज्ज्वल भवितव्यासाठी देवाला मनोभावे प्रार्थना करते.याप्रसंगी तिच्या हृदयातून असंख्य शुभेच्छांचा वर्षाव होत असतो.दरम्यान भाऊराया हा आपल्या बहिणीला तिच्या आवडीचे गिफ्ट देतो.खरं तर,भाऊ बहिणीच्या या अटूट स्नेहबंधांना तोड नाही,असे म्हणणे उचित ठरेल.

काळानुरूप रक्षाबंधनाचे  स्वरूप आता बदलत चालले आहे.पूर्वीच्या काळी साध्या गोंड्याच्या रेशमी राख्या भावांना बांधल्या जायच्या.पूर्वीच्या काळी विवाहित मुलींना लग्नानंतर वारंवार माहेरी जावयास मिळत नसे.म्हणूनच माहेरची खबरबात मिळावी,या अपेक्षेने *ती* रक्षाबंधनाच्या दिवशी भाऊरायाची दाराकडे डोळे लावून चातक

पक्षीसारखी वाट पहात असे.प्रथेनुसार भाऊ हा बहिणीसाठी साडीचोळी घेऊन जात असे.सध्याच्या काळी राखींचे स्वरूप खूपच बदलत चालले असून स्वस्तिक,प्लास्टिकची फुले,देव-देवतांचे फोटो,छोटा भीम अशा प्रतिकात्मक चिन्हाच्या राख्या बनविल्या जाताहेत.काही तर,चलनी नोटा वा चांदीच्या नाणी लावलेल्या राख्या असतात.हे सर्व प्रकार का होताहेत,याचा उलगडा होणं कठीण तर आहेच,त्याबरोबरच ते थांबविणे आता अवघडच आहे,असे वाटते. मित्रहो,*आलिया भोगासी असावे सादर* असंच समजावं.

बहीण जेव्हा भाऊरायाला त्याच्या मनगटावर राखी बांधते,त्या क्षणापासून भावावर तिच्या रक्षणाची/सुरक्षेची जबाबदारी येते.*ज्या* मनगटावर तिने राखी बांधली आहे,त्या 

मनगटातल्या ताकदीचा वापर वेळप्रसंगी तिच्या रक्षणासाठी होणे अभिप्रेत आहे.म्हणूनच त्याला *रक्षा बंधन* म्हणतात.भाऊरायावर *बंधन* आहे...तिची *रक्षा* करण्याची...हा गर्भित अर्थ आहे,हे भावांनी लक्षात घ्यावे.तिने राखी बांधली,नंतर तिला भाऊने गिफ्ट दिलं म्हणजे सर्वकाही झालं,असे समजू नये.कारण हे कलियुग आहे.*बहिणींची सुरक्षा* हा भावांसाठी प्राथम्याचा विषय आहे.

कारण आजच्या फॅशनेबल-आंबटशौकीन जगात मुलींचे किडनॅपिंग,छेडछाड,

विनयभंग,धमकावणे,एसिड फेकून मुलींचा चेहरा विद्रूप करणे,अब्रू लुटणे,

व्हिडिओद्वारे फोटो काढून मुलींना बदनाम करण्याचे-ब्लॅकमेल करण्याचे अश्लील प्रकार देशासह राज्यात कुठंकुठ घडत असतात.त्यामुळे आजच्या काळात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत चालला आहे.या असभ्य व अभद्र गोष्टी थांबविण्यासाठी किंवा त्यावर प्रतिबंध घालण्यासाठी केवळ सरकारी यंत्रणा वा पोलिसांवर अवलंबून रहाणे चुकीचे आहे.सांगण्याचे तात्पर्य म्हणजे महिलांच्या सुरक्षेसाठी भावांनी देखील वेळ काढणं ही काळाची गरज आहे.पोलीस अन् कायदा-कानून हे आपापले कर्तव्य बजावतीलच,यात दुमत नाही.पण *राखीची लाज राखण्यासाठी भावांनी आता कंबर कसली पाहिजे.*वास्तविक पहाता,भावांची सतर्कताच बहिणींच्या सुरक्षेची हमी देऊ शकते,हेच वास्तव आहे*.

*रक्षाबंधन* हा सण राष्ट्रीय एकता व अखंडतेचं प्रतिकही आहे.या सणाला खऱ्या अर्थाने कुठल्याही संप्रदायाचा रंग नाही.त्यामुळे त्याला उत्सवाचे स्वरूप प्राप्त होते.त्यातून हे राखीचे रेशमी बंध विविधतेतून एकतेचं दर्शन घडवितात.राज्यातील विविध अल्प बचत गट महिला मंडळाच्या भगिनी स्वतःच्या हाताने तयार केलेल्या राख्या भारतीय लष्कराच्या जवानांना बांधून त्यांच्या दीर्घायुष्यासाठी ईश्वराला प्रार्थना करतात.त्याचप्रमाणे 

*आरएसएस* चे स्वयंसेवक देखील या दिवशी घरोघरी जाऊन सर्वधर्मियांना राख्या बांधून एकमेकाला शुभेच्छा देतात.शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी-विद्यार्थिनीही रक्षा बंधननिमित्त आपापल्या मित्र-मैत्रिणींना राख्या बांधून सदिच्छा व्यक्त करतात.अशा या बहुआयमी सणाने उत्सवाचं रूप घेतल्याने तुमचा आमचा सर्वांचा हर्षोल्लास द्विगुणित होऊन आपापसातील मतभेद - मनभेद,दुरावा नाहिसा होतो.*हा तर खरा करिश्मा आहे या रेशमी बंधांचा...*

अत: तमाम बंधू-भगिनींना रक्षाबंधन अन् नारळी पौर्णिमानिमित्त हार्दिक शुभेच्छा!



Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने