वरिष्ठांच्या सुचना व मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर यांनी नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे अंतर्गत चोरी झालेल्या मोटार सायकल चोरीच्या पध्द्तीचा अभ्यास करुन वारंवार चोरी होणारे ठिकाण, वेळ, दिवस किंवा चोरी होणारी विशेष कंपनीची मोटार सायकल यांची इत्यंभूत माहिती घेवुन रेकॉर्डवरील,जेलमधुन सुटुन आलेल्या मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यातील गुन्हेगारांवर तसेच ज्या ठिकाणावरुन जास्त प्रमाणात मोटर सायकल चोरीस जातात त्याठिकाणी पाळत ठेवुन होते. तसेच आपले बातमीदारांमार्फत माहिती घेवुन मोटर सायकल चोरांचा शोध घेत होते.
दिनांक 08/01/2023 रोजी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी.आर.पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, तळोदा पोलीस ठाणे हद्दीतील बोरद गावातील दर्शन पाटील व मयुर जाधव असे त्यांचा न्युबन येथील एक साथीदाराच्या मदतीने तळोदा, शहादा परिसरातून मोटार सायकली चोरुन आणून शहादा येथील तौसिफ शेख यास विक्री करतात अशी बातमी मिळाल्याने, सदरची माहिती त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर यांना सांगितली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे 01 पथक तयार करुन त्यांना मिळालेल्या बातमीमधील संशयीतांवर लक्ष ठेवून माहिती घेणे सुचना दिल्या.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ तळोदा पोलीस ठाणे हद्दीतील बोरद गावातील दर्शन पाटील व मयुर जाधव यांची माहिती काढली असता, दोन्ही संशयीत इसम नेहमी वेगवेगळ्या दुचाकी वाहन फिरवत असतात व त्यांना भेटण्यासाठी शहादा येथील एक अनोळखी व्यक्ती येत असतो अशी माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिनांक 08/01/2023 रोजी पहाटेच्या सुमारास बोरद गावातील दर्शन पाटील व मयुर जाधव यांना त्यांच्या शेतातून ताब्यात घेतले व त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता 1) दर्शन कांतीलाल पाटील वय-19 2) मयुर किशोर जाधव वय-21 दोन्ही रा. बोरद ता. तळोदा जि. नंदुरबार असे सांगितले. त्यांना मोटार सायकल चोरीबाबत विचारपूस केली असता सुरुवातीला उडवा उडतवीची उत्तरे देवू लागला,स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयीतांना अत्यंत कौशल्यपुर्वक विचारपुस करुन त्याच्या विसंगत बाबी निदर्शनास आणून दिल्या व दोन्ही संशयीतांना बोलते केले. त्यांनी तळोदा, शहादा व म्हसावद येथे त्यांचा न्युबन येथील तिसरा साथीदार सागर चौधरी याचे मदतीने मोटार सायकल चोरीबाबत सविस्तर माहिती सांगितली. तसेच चोरी केलेल्या मोटार सायकली शहादा येथील तौसिफ शेख विक्री केल्याचे सांगितले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ न्युबन गाठून सागर चौधरी याचा शोध घेतला असता तो घरीच मिळून आल्याने त्यास त्याचे नाव गाव विचारले असता सागर उदेसिंग चौधरी वय-19 रा. न्युबन ता.तळोदा जि. नंदुरबार असे सांगितले.
तिन्ही संशयीत आरोपीतांना ताब्यात घेवून तौसिफ शेख याचा शोध घेतला असता तो, शहादा शहरातील गरीब नवाज कॉलीन परिसरात मिळून आल्याने त्यास त्याचे नाव गाव विचारले असता तौसिफ शेख भिकन शेख वय-25 रा. संजेरी चौक, गरीब नवाज कॉलनी, शहादा असे सांगितले. त्यास दर्शन पाटील, मयुर जाधव व सागर चौधरी यांनी चोरी करुन आणून त्यास दिलेल्या मोटार सायकलबाबत विचारपूस केली असता त्याने त्या मोटार सायकली जुना खेतिया रोड येथील गॅरेजच्या पाठीमागे लपवून ठेवल्याचे सांगितले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर ठिकाणी जावून तेथून 2 लाख 90 हजार रुपये किमतीच्या 07 मोटार सायकली ताब्यात घेतल्या आहेत. त्याबाबत 1) तळोदा पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 328/2022 भा.द.वि. कलम 379 2) शहादा पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 813/2022 भा.द.वि. कलम 379 3) म्हसावद पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 10/2023 भा.द.वि. कलम 379 प्रमाणे गुन्हे दाखल आहेत. उर्वरीत 04 मोटार सायकलींबाबत माहिती घेण्यात येत आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीकडून एकुण 2 लाख 90 हजार रुपये किमतीच्या 07 मोटार सायकली हस्तगत करुन 03 मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत.
तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या दुसऱ्या एका पथकाने दिनांक 08/01/2022 रोजी सारंगखेडा पोलीस ठाणे हद्दीतील टेंबे त.सा. येथील हंसराज बहादुर मालचे वय 23 वर्षे यास ताब्यात घेवून त्याने सारंगखेडा-टेंभा रस्त्यावरील एका नाल्याच्या पुलाखाली लपवुन ठेवलेल्या 45 हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी मोटार सायकल जप्त केलेल्या आहेत. जप्त केलेल्या मोटार सायकल चोरीबाबत सारंगखेडा पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 297/2022 व गु.र.नं. 07/2023 भा.द.वि. कलम 379 प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
ताब्यात घेण्यात आलेल्या वेगवेगळ्या 04 आरोपीतांकडून एकुण 3 लाख 35 हजार रुपये किमतीच्या 09 मोटार सायकल हस्तगत करुन मोटार सायकल चोरीचे 05 गुन्हे उघडकीस आलेले आहेत. तसेच ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीतांकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही असे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी.आर.पाटील यांनी सांगितले.
सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, नंदुरबार श्री. पी.आर.पाटील, अपर पोलीस अधिक्षक श्री. निलेश तांबे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर, सहा.पोलीस निरीक्षक श्री. संदीप पाटील, पोलीस नाईक बापु बागुल, सुनिल पाडवी, विशाल नागरे, पुरुषोत्तम सोनार, विकास कापुरे, मोहन ढमढेरे,पोलीस अंमलदार किरण मोरे, राजेंद्र काटके यांच्या पथकाने केली आहे.
