शासकीय आश्रमशाळेची पक्की इमारत बांधून द्या: बिरसा फायटर्स
बिरसा फायटर्स शिरपूर तालुका यांची मागणी
शिरपूर: तालुक्यातील मौजे जामण्यापाडा, अर्थे खुर्द, हिवरखेडा व उमर्दा येथील शासकीय आश्रमशाळेची पक्की इमारत बांधून मिळावी अशा आशयाचे निवेदन दि. २४ रोजी देत बिरसा फायटर्स शिरपूर यांनी प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धुळे यांच्याकडे केली.
निवेदनात म्हटले आहे की, शिरपूर तालुक्यातील जामण्यापाडा, अर्थे खुर्द, हिवरखेडा व उमर्दा येथे शासकीय आश्रमशाळेची पक्की इमारत नसल्याने मुलांना कौलारु घरात शिक्षण घ्यावे लागत आहे. ना तिथे चांगल्या शौचालयाची, जेवणाची बैठक व्यवस्था, खेळासाठी मैदान, ना शिक्षणासाठी चांगली वर्गखोल्या आहे. शिक्षण हक्क अधिनियम २००९ नूसार कोणत्याही प्रकारच्या भौतिक सुविधा विद्यार्थ्यांना मिळत नाही.
विद्यार्थ्यांना भौतिक सुविधा मिळत नसल्याने शिक्षणाच्या गुणवत्तेत वाढ होत नाही, तसेच विद्यार्थ्यांची संख्या ही कमी होत आहे. जामण्यापाडा, कर्जे खुर्द, हिवरखेडा व उमर्दा येथे शाळेकरीता इमारत बांधण्याकरीता जागा ताब्यात घेतली आहे, परंतु अद्यापही कुठल्याही गावात इमारतीचे काम सुरू करण्यात आले नाहीत. आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन स्तरावर विविध प्रकारचे उपक्रम राबविले जातात परंतु शिरपूर तालुक्यातील इमारती नसलेल्या गावातील विद्यार्थ्यांना त्याचा फायदा कसा मिळणार?
विद्यार्थ्यांना भौतिक सुविधा मिळाव्या म्हणून जामण्यापाडा, अर्थे खुर्द, हिवरखेडा व उमर्दा येथे शासकीय आश्रमशाळेची पक्की इमारत बांधून मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे, जर मागणी पुर्ण नाही झाली तर येत्या काही दिवसांत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय धुळे येथे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
निवेदनावर ईश्वर मोरे तालुकाध्यक्ष शिरपूर, गेंद्या पावरा सचिव शिरपूर, साहेबराव पावरा, सचिव जिल्हा धुळे, वसंत पावरा जिल्हाध्यक्ष धुळे व विलास पावरा अध्यक्ष नाशिक विभाग यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
