नांदेड : एखाद्या चित्रपटातील कथानकात त्याप्रमाणे डायलॉग बाजी असते आणि नायक आणि खलनायक एकमेकास खून का बदला खून असे म्हणून संबोधतात अशाच प्रकारची एक विचित्र व दुर्दैवी घटना नांदेड शहरात घडले असून या दुहेरी हत्याकांडामुळे नांदेड शहर हादरले आहे.
अर्धी दाढी झाल्यावर ग्राहक आणि न्हाव्यामध्ये वाद झाला आणि या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. यावेळी न्हाव्याने आपल्याकडील धारधार शस्त्राने थेट ग्राहकाचा गळा चिरला. यामध्ये ग्राहकाचा जागीच मृत्यू झाला. ग्राहकाचा गळा चिरल्यानंतर ग्राहकाच्या नातेवाईकांनी आणि संतप्त जमावाने न्हाव्यावर हल्ला करत त्याला ठेचून ठार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नांदेड जिल्ह्यातील बोधडी या गावात ही दुहेरी हत्याची घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनिल मारुती शिंदे असं सलून चालकाचे नाव आहे. तर, व्यंकट सुरेश देवकर वय 22 असं ग्राहकाचे नाव आहे. व्यंकट देवकरचा खून सलून चालक अनिल शिंदे याने क्षुल्लक कारणावरुन केला होता. यानंतर व्यंकटच्या खुनाचा बदला त्याच्या नातेवाईकानी अवघ्या काही तासातच घेतला.
पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी आहे की, सायंकाळी पाच ते साडेपाच वाजण्याच्या सुमारास बोधडी गावात राहणारा व्यंकट सुरेश देवकर हा तरुण दाढी करण्यासाठी अनिल मारुती शिंदे यांच्या दुकानात गेला. अनिलने व्यंकटला दाढी करण्यासाठी खुर्चीवर बसवले, त्याची अर्धी दाढी देखील केली. अर्धी दाढी झाल्यावर अनिल शिंदेने व्यंकटला दाढीचे पैसे मागितले. तेव्हा देवकरने माझी दाढी पूर्ण कर दाढी झाल्यावर पैसे देतो असं व्यंकट म्हणाला. यावर अनिलने मला आताच पैसे दे अशा बोलण्यावरून दोघात वाद सुरु झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी चक्क अनिलने व्यंकटचा धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केली.अनिलने व्यंकटची हत्या केल्याची बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली. देवकरच्या नातेवाईकांनी जमाव करून प्रथम अनिल मारुती शिंदे या नावाचे सलूनचे दुकान जाळून टाकले आणि त्यानंतर त्याचा शोध घेऊन त्याला गावच्या भर मार्केटमध्ये आणून त्याचा ठेचून खून केला. दरम्यान, त्याचे घर देखील जाळण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे.बोधडी या गावात मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे
सदर घटनेची माहिती किनवट पोलिसांना गावातील काही मंडळींनी दिली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशामक दलाची गाडी ही घटनास्थळी पोहचली असून बोधडीत सध्या तणावपूर्ण शांतता आहे. किनवटचे पोलीस निरिक्षक अभिमन्यु साळुंके यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सध्या बोधडी या गावात मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे.