धुळे - धुळे जिल्ह्यात पुन्हा एका खुनाच्या घटनेने खळबळ माजली असून किरकोळ वादातून होत असलेल्या खूनाच्या घटनेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. यापूर्वी शिरपूर तालुक्यात देखील किरकोळ वादातून वृद्ध पित्याची हत्या झाल्याची घटना समोर आली होती.
साक्री तालुक्यातील हट्टी शिवारात आणखी एक खूनाची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. शेतीच्या वादातून बेदम मारहाण करीत रुमालाने गळा आवळून युवकाचा खून करण्यात आला. काल दुपारी ही घटना घडली. याप्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.
याबाबत संगिताबाई गोरख सुपनर (वय 29 रा. दुसाणे व ह.मु हट्टी शिवार, डोंगराळे रस्त्यालगत असलल्या शेतात) यांनी निजामपूर पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्याचा पुतण्या भगत उर्फ भरत भगवान सुपनर (वय 19 रा. डोंगराळे) हा काल दुपारी चार वाजेच्या सुमारास हट्टी शिवारातील तुकाराम मिस्तरी यांच्या शेताजवळ मेंढ्या चारत होता.
तेव्हा दामु यादव बिचकुले, नामदेव यादव बिचकुले, पिंटु यादव बिचकुले, बारकु यादव बिचकुले (रा. डोंगराळे, बुधा नागो सुपनर, सिंधा नागो सुपनर, बापु नागो सुपनर, खंडु सिंधा पिसाळ, मदन सिंधा पिसाळ व गोरख भगत बुरुगले सर्व (रा. दुसाणे) यांनी भरत यास फिर्यादीचे पती व जेठ यांच्या सोबत असलेल्या शेतीच्या वादातून शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली. तर दामु बिचकुले काठीने मारहाण केली. तर नामदेव बिचकुले याने रूमालाने गळा आवळला तर इतरांनी धक्काबुक्की करत ओढताण करून त्याला खाली पाडून मारहाण केली. तेव्हा संगिताबाई सुपनर यांनी सोडवासोडव करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मारहाण करणार्यांनी येथून निघुन जात, नाहीतर तुम्हालाही जिवंत सोडणार नाह, अशी धमकी दिली. या मारहाणीत भरत सुपनर याच मृत्यू झाला.
याप्रकरणी वरील दहा जणांविरोधात भादंवि कलम 302, 323, 504, 506, 143, 147, 148, 149 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांनी बुधा सुपनर, खंडु पिसाळ, मदन पिसाळ, गोरख बुरूगंले आणि बापु सुपनर या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि श्रीकांत पाटील करीत आहेत.
