शिरपूर - राज्यातील बारा बलुतेदारांना व्यावसायिक दृष्टिकोनातून सक्षम करण्यासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणार, शिवरत्न जिवाजी महाले व वैराग्यमूर्ती संत गाडगे बाबा यांच्या स्मारकाला निधी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती मंत्री ना. विजय वडेटटीवार यांनी दिली. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात नुकताच कार्यक्रम संपन्न झाला. राज्यस्तरीय ओबीसी बहुजन परिषदेला संबोधित करतांना मंत्री ना. विजय वडेटटीवार यांनी नवीन संघटनेची घोषणा केली. यावेळी ना. विजय वडेटटीवार यांची सर्वानुमते ओबीसी व्हिजेएनटी बहुजन परिषद, भारतच्या राष्ट्रीयाध्यक्षपदी हात वर करून निवड करण्यात आली. राज्यव्यापी ओबीसी बहुजन परिषदेला राज्याचे ओबीसी बहुजन नेते कल्याण दळे, प्रा. सुशीला मोराळे, शब्बीर अंसारी, आ. राजेश राठोड, माजी आ. रामराव वडकुते, महाज्योती संचालक लक्ष्मण वडले, म्हाडाचे अध्यक्ष शिवाजी ढवळे, मुकुंद मेटकर यांचा सहित धुळे जिल्ह्यातुन बारा बलुतेदार महासंघ उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष एकनाथराव बोरसे, धोबी समाज प्रदेश उपाध्यक्ष अरुण धोबी, शिरपूर बाराबलुतेदार महासंघ तालुकाध्यक्ष योगीराज बोरसे (शिंपी), तालुका उपाध्यक्ष गिरीश कुंभार, शहराध्यक्ष रमेश चौधरी, शहर उपाध्यक्ष अभिजित शिंपी, शहर कोषाध्यक्ष सुभाष लोहार, शहर सदस्य राधेश्याम भोई उपस्थित होते. ते पुढे म्हणाले की, भारत स्वतंत्र होऊन ७५ वर्ष पूर्ण होऊन सुद्धा बहुसंख्य असलेल्या ओबीसी समाजाला आज पर्यंत न्याय मिळाला नाही. पुढे ही अपेक्षा करणे चुकीचे होते म्हणून ओबीसी व उपेक्षित असलेल्या समाजामधे जागृती निर्माण करणे व देशभरातील बहुसंख्य जनतेला आंदोलनात्मक विचार देणे या करिता "ओबीसी व्हिजेएनटी बहुजन परिषद, भारत" या संघटनेला सुरुवात करण्यात आली. मंत्री ना. विजय वडेट्टीवार म्हणाले की, मी मंत्री झालो तेव्हा पासून तर आज पर्यंत फक्त ओबीसीच्या हितासाठी कार्य केले आहे आणि आज नवीन संघटनेच्या स्थापना दिनानिमित्त जाहिर करतो की, माझ्या आयुष्यातील शेवटच्या स्वासापर्यंत मी राज्यातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करणार आहे असे प्रतिपादन संघटनेचे राष्ट्रीयाध्यक्ष तथा मंत्री ना. विजय वडेटटीवार यांनी केले. संघटनेला राज्यात चालना मिळावी या करीता बारा बलुतेदार महासंघ प्रदेशाध्यक्ष कल्याण दळे यांची ओबीसी व्हिजेएनटी बहुजन परिषद महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्षपदी निवड जाहिर करण्यात आली.