सांगली येथील दांपत्य कडून श्री नागेश्वर मंदिरासाठी दोन किलो वजनाच्या चांदीच्या समया भेट





शिरपूर : धार्मिक महात्म्यासह पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित झालेल्या श्री नागेश्वर संस्थानची किर्ती राज्य पातळीवरही पोहचली आहे. सांगली येथील दांपत्याने श्री नागेश्वर मंदिरासाठी दोन किलो वजनाच्या चांदीच्या समया अर्पण केल्या.
 
सांगली येथील दांपत्याने गेल्या वर्षी नागेश्वर येथे दर्शनासाठी हजेरी लावली होती. त्यावेळी केलेला नवस पूर्ण झाल्याने त्यांनी पुन्हा नागेश्वर येथे येऊन दोन किलो चांदीच्या समया मंदिराला देण्यासाठी नागेश्वर संस्थानच्या विश्वस्तांकडे सोपवल्या.
 
संस्थानतर्फे सदर दांपत्याचा सत्कार करण्यात आला. पंचायत समितीचे माजी उपसभापती संजय पाटील, पंचायत समिती माजी उपसभापती प्रकाश चौधरी, पिळोद्याचे सरपंच योगेश बोरसे, शिरपूर पीपल्स बँक संचालक संजय चौधरी, जितेंद्र सूर्यवंशी यांच्यासह विश्वस्त उपस्थित होते. यावेळी सांगलीच्या दांपत्याने सांगितले की, नागेश्वरचे धार्मिक महात्म्य अपरंपार आहे. त्याची ख्याती संपूर्ण राज्यात पसरली आहे. नागेश्वर येथील वृक्षसंवर्धनाच्या उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले. धार्मिक व पर्यटनदृष्ट्या विकसित असलेली अशी स्थळे फार दुर्मिळ असून आम्ही पाहिलेल्या सर्वोत्कृष्ट स्थानांमध्ये त्याचा समावेश होतो.
प्राचीन काळापासून सातपुड्याच्या डोंगररांगेत असलेल्या नागेश्वर महादेवाच्या मंदिराचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केला. शिरपूरचे उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी परिसराच्या विकासासाठी श्री नागेश्वर मंदीर संस्थानची स्थापना केली. त्यानंतर नागेश्वरचा कायापालट झाला. रस्ते, सभामंडप, छत असलेला दर्शनमार्ग, धर्मशाळा, स्वयंपाकगृह, भोजनगृह अशा सुविधांमुळे दर्शनासाठी येणारे भाविक, नवस फेडणारे यांची मोठी सोय झाली. तेथील यात्रौत्सव पंचक्रोशीत प्रसिद्ध झाला आहे. पाठोपाठ श्री दत्तात्रय, मोती माता, ऋषी महाराज, श्री गणेश आदि दैवतांची सुसज्ज मंदिरे भूपेशभाईंच्या संकल्पनेतून उभारली. विविध स्वयंसेवी संघटनांसह स्वखर्चाने सिंचनाची सुविधा करुन देत भूपेशभाई पटेल यांनी परिसरात विक्रमी वृक्षारोपण केले. नागेश्वर परिसरातील डोंगरमाथ्यावर कै.तपनभाई पटेल यांनी विमानातून सीडबॉल टाकून महाराष्ट्रात अभिनव प्रयोग केला. या सर्व प्रयत्नांच्या परिणामस्वरुप नागेश्वर येथे घनदाट वृक्षराजी तयार झाली आहे. नागेश्वर येथे नारायण नागबली विधीदेखील केला जात असल्याने या परिसराचे महात्म्य वाढीस लागले असून आगामी काळात राज्यभरातून भाविक व पर्यटकांचा राबता तेथे वाढेल असा विश्वास संस्थानतर्फे व्यक्त करण्यात आला.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने