धुळे, दि. 21 (जिमाका वृत्तसेवा) : धुळे जिल्ह्यास जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत (सर्वसाधारण) सन 2022-23 मध्ये मंजूर 175 कोटी रुपयांच्या नियतव्ययवरून 225 कोटी रुपयांच्या नियतव्यय आज सकाळी झालेल्या राज्यस्तरीय ऑनलाइन बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंजूर केला. या वाढीव निधीतून श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयास एमआरआय मशीन खरेदीसाठी 22 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.
धुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबध्द आहे. त्याचाच एक भाग म्हणून सन 2022- 23 या वर्षाकरीता वाढीव 50 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. या निधीतून आरोग्य, शिक्षण, दळण- वळणाच्या सुविधांना बळकटी मिळणार आहे, असे धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल, ग्रामविकास, खारजमीन विकास, बंदरे आणि विशेष साहाय्य राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.
जिल्हा वार्षिक योजनेची राज्यस्तरीय बैठक आज सकाळी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन आयोजित करण्यात आली होती. यावेळी धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. सत्तार हे जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथून सहभागी झाले होते. या बैठकीला मुख्य सचिव देबशीष चक्रवर्ती, धुळे जिल्ह्याचे पालक सचिव विकास रस्तोगी, नाशिक विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे ऑनलाइन सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयातून धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, आमदार काशिराम पावरा, आमदार मंजुळाताई गावित, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, महानगरपालिकेचे आयुक्त देवीदास टेकाळे, उपवनसंरक्षक माणिक भोसले, जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर आदी सहभागी झाले होते.
जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) करीता 175 कोटी रुपयांची आर्थिक मर्यादा देण्यात आली होती. मात्र, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांचे बळकटीकरण, अतिवृष्टीमुळे रस्त्यांचे झालेले नुकसान, वीज आणि शिक्षणाच्या बळकटीकरणासाठी वाढीव निधी मिळावा, अशी मागणी पालकमंत्री श्री. सत्तार यांनी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्याकडे केली होती. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी 225 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला.
जिल्हा वार्षिक योजनेत उपलब्ध झालेल्या निधीतून जिल्ह्याच्या विकासाचे नियोजन करून चालना द्यावी. निधी वेळेत खर्च होईल याची दक्षता घ्यावी. तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरणाला गती द्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी जिल्हा प्रशासनास दिले. तसेच श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयास एमआरआय मशीनसाठी 22 कोटी रुपये मिळणार असल्याने धुळेसह खानदेशातील रुग्णांना मदत होईल. तसेच आरोग्य सेवेचे बळकटीकरण होण्यास मदत होईल, असे पालकमंत्री श्री. सत्तार यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. रंधे, आमदार श्री. पावरा, आमदार श्रीमती गावित आदींनी सहभाग घेतला. जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी सन 2021- 22 चा आतापर्यंत झालेला खर्च आणि सन 2022- 23 या वर्षाच्या प्रारुप आराखड्याविषयी सविस्तर माहिती दिली.
Tags
news
