धुळे, दि. 11 (जिमाका वृत्तसेवा) : कोरोना विषाणूमुळे पती गमावलेल्या विधवा महिला आणि अनाथ बालकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा. या कुटुंबांतील मुलींचे पोलिस दलाच्या ‘भरोसा सेल’च्या माध्यमातून समुपदेशन करावे. कोविड- 19 मुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसांच्या नोंदी तातडीने करून द्याव्यात. विधवा महिलांसाठी समाधान शिबिर घेवून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी, अशा सूचना महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी केल्या.
डॉ. गोऱ्हे यांनी आज सकाळी धुळेसह जळगाव, नाशिक, पुणे, जालना व पालघर जिल्ह्यातील कोरोना महामारीच्या काळात गावे कोरोनामुक्त करण्यासाठी केलेली नावीण्यपूर्ण कामे, कोविड- कालावधीत असंघटित कामगारांच्या झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी शासनाने मंजूर केलेल्या आर्थिक मदतीचा आढावा ऑनलाइन पद्धतीने घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या. या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील आदींसह विविध विभागांचे प्रमुख ऑनलाइन सहभागी झाले होते.
उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, कारोना काळात शासनाने समाजातील विविध घटकांसाठी महत्वपूर्ण निर्णय घेत योजना राबविल्या आहेत. या योजनांची जिल्हा प्रशासनाने प्रभवी अंमलबजावणी केली आहे. कोरोना विषाणूमुळे पती गमावलेल्या विधवा महिलांना ‘उमेद’च्या माध्यमातून बचत गटांमध्ये सामावून घ्यावे. या बचत गटांमार्फत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक साधनांची निर्मिती करावी. त्यासाठी याविषयीचे काम बचत गटांना द्यावे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू असलेले नियम आणि कोविड- 19 लसीकरणासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करावी. त्यासाठी ग्रामीण भागात दवंडीसारख्या साधनांचा अवलंब करावा. कोरोनामुळे पालकांचा मृत्यू झाल्याने अनाथ बालकांच्या वारस हक्कानुसार नोंदी घेत निधी वाटपाची कार्यवाही पूर्ण करावी. गावपातळीवर लसीकरण मोहिमेचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासोबतच महिला व बालविकास, कृषी तसेच ग्रामविकास विभागाने महिला विषयक कायदे, योजनांची माहिती उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करावे. बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्न करावे, असेही त्यांनी सांगितले.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही गावांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. कोरोना विषाणूमुक्त गावांनी राबविलेले उपक्रम अनुकरणीय आहेत. या गावांमध्ये प्रतिपिंड (अँटिबॉडीज) तपासणी मोहीम आरोग्य विभागाच्या माध्यमातून राबवावी. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बजावलेली कामगिरी आणि कोविड- 19 मुळे ज्यांच्यावर आपत्ती आली, त्यांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या कामगिरीबद्दल उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी समाधान व्यक्त केले.
निवासी उपजिल्हाधिकारी श्री. गायकवाड यांनी सांगितले, धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूमुळे पती गमावलेल्या महिलांना लाभ मिळवून देण्यात येत आहेत. वात्सल्य योजनेचा लाभ बालकांना मिळवून देण्यात येत आहे. 14 अनाथ बालकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे. 159 विधवा महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ सुरू करण्यात आला आहे. पाच महिलांना श्रावण बाळ योजनेचा, तर तीन महिलांना इंदिरा गांधी निराधार योजनेचा लाभ देण्यात आला. कामगार विभागाच्या माध्यमातून नऊ हजार 705 बांधकाम कामगारांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचा, तर प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून 8 हजार 205 रिक्षा चालकांना प्रत्येकी दीड हजार रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. तसेच 65 हजार 727 आदिवासी बांधवांना खावटी कीटचे वाटप करण्यात आले आहे. याशिवाय दररोज 3100 शिवभोजन थाळींचे वितरण करण्यात येत आहे, असे सांगितले.
Tags
news
