पुणे:अवघ्या काही तासांवर साखरपुडा आलेला असताना कर्वेनगरमधील चितळे दुकानाजवळ एका तरुणावर धारदार शस्त्रांनी वार करून त्याचा खून केल्याची घटना रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली आहे.अनिल राजेंद्र जाधव (वय २०, रा. डहाणूकर कॉलनी, कोथरूड) असं खून झालेल्या तरुणाचं नाव असून परिसरात याची जोरदार चर्चा सुरु आहे .
उपलब्ध माहितीनुसार, अनिल याचा सोमवारी साखरपुडा होता. तो त्याच्या बहिणीला लक्ष्मीनगर परिसरातील एका हॉटेलमध्ये सोडण्यासाठी आला होता. बहिणीला सोडून जात असताना ताथवडे उद्यान परिसरातील देवेश चितळे दुकानाजवळ दोन ते तीन अज्ञात हल्लेखोरांनी अनिल याला अडवलं आणि त्याच्यावर धारदार शस्त्रांनी वार केले. दुसऱ्याच दिवशी साखरपुडा असल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण होते मात्र अचानक या घटनेने सर्व कुटुंबावर शोककळा पसरली आहे .
अनिल हा रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर हल्लेखोर पसार झाले. अत्यंत गजबजलेल्या परिसरात ही घटना घडल्याने काही काळ कोणालाच काही सुचेनासे झाले. मात्र काही जागरूक नागरिकांनी यानंतर घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच अलंकार व गुन्हे शाखेचे पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले मात्र तोवर या हल्ल्यात अनिल याचा मृत्यू झाला होता. अनिल याचा सोमवारी साखरपुडा होता. त्याच्या अगोदरच त्याचा खून झाल्याने जाधव कुटुंब हादरून गेलं आहे. या तरुणाच्या खुनामागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून पोलीस अधिक तपास करत आहेत.
राजेंद्र जाधव याच्या आईचे ६ महिन्यांपूर्वी निधन झाले होते. त्याला ४ बहिणी असून त्यातील तिघींचा विवाह झाला आहे. वडिलांशी पटत नसल्याने तो बहिणीकडे रहात होता. तो मिळेल ते काम करीत होता. अशी माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली.
Tags
news
