शिरपूर प्रतिनिधी : तालुक्यातील घरकुल 'ड' यादीतील विविध समस्या बाबत आज शिरपूर तालुक्यातील सरपंचांनी आपल्या व्यथा आमदार श्री काशिराम पावरा यांच्या जवळ मांडल्या. आमदार श्री पावरा यांनी विषयाचे गांभीर्य ओळखून लागलीच गट विकास अधिकारी युवराज शिंदे व घरकुल विभागाचे विकास पाटील यांना आमदार कार्यालयात बोलवून घेतले.
घरकुल यादी 'ड' मध्ये बऱ्याच लाभार्थ्यांचे नावे गायब झाले आहेत. काही लाभार्थी पक्क्या घरात भाडेकरू म्हणून राहत होते त्यांचे नाव देखील वगळण्यात आले आहेत तर काहींना प्रधानमंत्री आवास योजनेचा या अगोदर लाभ घेतला आहे म्हणून वगळण्यात आले आहे परंतु वगळण्यात आलेल्या लाभार्थ्यांनी असा कुठल्याही घरकुलाचा या अगोदर लाभ घेतलेला नाही, तर काहींना राहायला घर नाही म्हणून भाडेकरू तत्वावर दुसऱ्याच्या पक्क्या घरात वास्तवात आहेत त्यांचे देखील नाव यादीत नाही म्हणून सरपंचांनी आमदारांच्या समक्ष गटविकास अधिकाऱ्यांशी घरकुलातील विविध त्रुटी बाबत चर्चा केली.
बऱ्याच मोठ्या गावांत लोकसंख्येच्या मानाने कमी घरकुल मंजूर झाली आहेत. काही लाभार्थी मयत झाले आहेत, काही गावात खऱ्या लाभार्थ्यांना वगळण्यात आले आहे तर काही लखपतींनाही घरकुल मंजूर झाली आहेत. आमदार, अधिकारी व सरपंचांनी बऱ्याच वेळ चर्चा करून काही प्रश्न मार्गी लावले.
यावेळी ताजपुरी सरपंच हेमंत पाटील, बोरगांव सरपंच योगेंद्रसिंग सिसोदिया, अजंदे खु सरपंच राजेंद्र पाटील, वाठोडे सरपंच नारायण चौधरी, जगदीश देशमुख आमोदा, भोरटेक सरपंच सुरेश गुजर, मांडळ सरपंच सुनिल माळी, जापोरा सरपंच डिगंबर गुजर, मांजरोद सरपंच भुवनेश्वर, घोडसगाव सरपंच हुकूमचंद, पिळोदे सरपंच रावण भिल, सावळदे सरपंच सचिन राजपुत, हिंगोणी सरपंच सोमा भिल उपस्थित होते.
Tags
news