कर्मयोगी कारखान्यावरील शेतकऱ्यांचा विश्वास सार्थ ठरविणार - हर्षवर्धन पाटील - 5 बैठकांना शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद - चालु हंगामातील रु.14 कोटीची बिले अदा - कारखान्याचे 2.5 लाख टन गाळप पूर्ण प्रतिनिधी दत्ता पारेकर




     पुणे:  कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखान्याने चालू हंगामात आज अखेर 2.5 लाख मे. टन ऊसाचे गाळप पूर्ण केले आहे. सध्या प्रतिदिनी 8000 मे. टन क्षमतेने ऊसाचे गाळप केले जात असून आजपर्यंत चालू हंगामातील रु.14 कोटीची ऊस बिले शेतकऱ्यांना अदा करण्यात आली आहेत. तसेच कारखान्यामध्ये चालू हंगामात पहिल्यांदाच इथेनॉलचे उत्पादन घेतले जात असून 81 लाख लिटर इथेनॉल पुरवठ्याचे टेंडर कारखान्याला मिळाले आहे. कारखान्याचा चालू गळीत हंगाम उत्कृष्टपणे सुरु असून, कर्मयोगी कारखान्यावरील शेतकऱ्यांचा असलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी संचालक मंडळ कटिबद्ध असल्याची स्पष्ट ग्वाही कारखान्याचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी रविवारी (दि.12) दिली.
     महात्मा फुलेनगर (बिजवडी ता. इंदापूर ) येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये आज  दिवसभर 1) सरडेवाडी  2) शिरसोडी  3) कालठण नं. 1,  4) भिगवण   5) पळसदेव  हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी भव्य संवाद बैठका संपन्न झाल्या. या बैठकांना शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.
    हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, कारखान्यावरती प्रेम करा, कारण सहकारी संस्था महत्वाच्या आहेत. कर्मयोगी शंकररावजी पाटील उर्फ भाऊंनी स्थापन केलेल्या कारखान्याने 31 वर्षांमध्ये शेतकरी, कर्मचारी व  हजारो कुटुंबांना आर्थिक आधार दिला आहे. कर्मयोगी कारखाना सहकाराचे मंदिर आहे. कारखान्याने सर्व उपपदार्थ निर्मितीचे प्रकल्प उभारले आहेत.  त्यामुळे कारखान्यास आगामी काळात गतवैभव प्राप्त करण्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी साथ द्यावी, असे आवाहन हर्षवर्धन पाटील यांनी केले.
         कारखान्याकडून मस्टरनिहाय ऊस बिले वेळेवर दिली जात आहे, वेळेवर ऊस बिले मिळण्याचे काटेकोर नियोजन केलेले आहे. गाळप क्षमता विस्तारीकरण व दोन दुष्काळामुळे कारखाना काहीसा अडचणीत आला, मात्र योग्य नियोजनामुळे आता अडचणीचा काळ दूर होत चालला आहे. कारखान्याची मालमत्ता तब्बल 650 कोटी झाली आहे. लवकरच कारखाना प्रतिदिनी 9000 मे. टन ऊस गाळपाचा पल्ला पार करेल, तसे नियोजन करण्यात आले आहे. आपल्या सर्वांचाच कारखाना असल्यामुळे चालू हंगामात 12 लाख मे. टन ऊस गाळप पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करावे, अशी आवाहन या संवाद बैठकांमधून हर्षवर्धन पाटील यांनी केले.
         कर्मयोगी कारखान्यास माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे सक्षम नेतृत्व लाभले आहे, त्यामुळे आगामी काळ कारखान्यासाठी गतवैभव प्राप्त करणारा राहील, असे भाषणामध्ये कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा यांनी सांगितले.
     यावेळी कारखान्याचे संचालक  हिरालाल पारेकर हनुमंत जाधव, शांतीलाल शिंदे, रवींद्र सरडे, छगन भोंगळे, बाळासाहेब पाटील, राहुल जाधव, अंबादास शिंगाडे, पराग जाधव, विश्वास देवकाते, निवृत्ती गायकवाड, भूषण काळे, प्रवीण देवकर, रतन देवकर, केशव दुर्गे, सतीश व्यवहारे, वसंत मोहोळकर, शारदा पवार, कांचन कदम, कार्यकारी संचालक देवराव लोकरे, शेतकी अधिकारी   व गावोगावचे पदाधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हर्षवर्धन पाटील यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधला व अडीअडचणी जाणून घेतल्या. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केल जात आहे .   

कर्मयोगीने ऊस नेण्यासाठी शेतकऱ्यांचा आग्रह!
सरडेवाडी येथील बैठकीत कर्मयोगी कारखान्यावर शेतकऱ्यांची असलेली आपुलकीची व विश्वासाची भावना दिसून आली. यावेळी बोलताना अनेक शेतकऱ्यांनी सांगितले की, कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखान्याने ऊस गाळपासाठी नेण्यासाठी शेतकऱ्यांचा आग्रह आहे. शेतकरी हे त्यासाठी कारखान्याच्या शेतकी विभागाकडे भेटून पाठपुरावा करीत आहेत. या परिसरातील काही गावांमध्ये कर्मयोगी कारखान्याने वाहन संख्या वाढवावी.
कारखान्याचे कामकाज हे राजकारण विरहित व शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून चालविले जात आहे. त्यामुळे पक्षीय राजकारणात न ठेवता  शेतकऱ्यांनी आपला सर्व ऊस कर्मयोगी करखान्याकडे गाळपास पाठविण्याची मानसिकता ठेवावी, असे आवाहन हर्षवर्धन पाटील यांनी केले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने