पुणे : कौटुंबिक वादाच्या कारणातून आपल्या तीन वर्षाच्या मुलाला आईनेच विषारी औषध पाजून संपविले आणि तिनेही औषध घेऊन स्वत:ही गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मुलाचा खून करणा-या आईला न्यायालयाने जन्मठेप आणि सात हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. सत्र न्यायाधीश जी. पी. अगरवाल यांनी हा निकाल दिला.
स्वाती विक्रम माळवदकर (वय २५, रा. तळवडे) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तळवडे येथे २ ऑगस्ट २०१६ रोजी सकाळी अकराच्या सुमारास हा प्रकार घडला होता. याबाबत स्वाती यांचे दीर श्रीकांत माळवदकर (वय ३०) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार स्वाती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेच्या एक वर्ष आधी फिर्यादी व त्यांचा भाऊ विक्रम आणि आई-वडील असे सर्व एकत्र राहत होते. मात्र
स्वातीला ते मान्य नसल्याने तिचे सासू-सासरे गावी राहू लागले होते. सर्वांनी एकत्र राहावे, अशी विक्रम यांची इच्छा होती. त्यामुळे विक्रम आणि स्वाती यांच्याच वाद झाले होते.
घटनेच्या दिवशी स्वाती हिने विक्रम यांचा फोन उचलला नाही. त्यामुळे विक्रम यांनी फिर्यादी यांना घरी जाण्यास सांगितले. त्यावेळी त्यांना पुतण्या निशिगंध अंथरुणात झोपलेला दिसला. तर त्यांची वहिनी स्वाती ही घरात बेशुद्ध पडलेली व पंख्याला साडी बांधलेल्या अवस्थेत दिसली. त्यामुळे फिर्यादींनी दोघांना रुग्णालयात दाखल केले. तेव्हा डॉक्टरांनी पुतण्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. तर स्वातीला काही दिवस उपचार केल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला होता. या खटल्याचे कामकाज सरकारी वकील लीना पाठक यांनी पाहिले. त्यांना अँड. मनोज बिडकर यांनी मदत केली.
Tags
news