माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या आतापर्यंत ७ ग्रामसेवकांवर राज्य माहिती आयोगाची कारवाई
शहादा- तालुक्यातील शोभानगर आणि पिंप्राणी येथील ग्रामपंचायत येथे माहिती अधिकार अधिनियम २००५ अन्वये, माहिती मिळण्याकरिता माहिती अधिकार कार्यकर्ता राजेश्वर सामुद्रे यांनी ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज सादर केले होते. प्रथम अपील विहित वेळेत माहिती न देणाऱ्या तत्कालीन जनमाहिती अधिकारी तथा ग्रामसेवक श्री.एस.डी.गायकवाड (शोभानगर ग्रामपंचायत), आणि श्रीमती रिना वळवी (पिंप्राणी ग्रामपंचायत) यांच्यावर द्वितीय अपिलात राज्य माहिती आयुक्त के.एल.बिश्नोई यांनी शास्तीची कार्यवाहीचे आदेश दिले आहे. मागील आठवड्यातच कळंबू, असलोद, मलोनी, अनरद येथील एकूण ५ ग्रामसेवक आणि आता २ ग्रामसेवक अशा एकूण ७ ग्रामसेवकांवर कारवाई होत असल्याने तालुक्यासह जिल्ह्याभरात चर्चा सुरु आहे.
दि.३०/०६/२०१८ रोजीच्या माहिती अर्जान्वये दि.०१/०४/२०१३ ते दि.३०/०६/२०१८ या कालावधीत मौजे शोभानगर गावाच्या विकासासाठी जनहितासाठी शासनाच्या ज्या योजनांची अंमलबजावणी संदर्भातील सविस्तर माहिती मिळण्याकरिता माहिती अधिकार कार्यकर्ता राजेश्वर सामुद्रे यांनी माहिती मागितली होती. सदर माहिती अर्जाच्या अनुषंगाने राज्य माहिती आयोगाकडे दाखल झालेल्या उपरोक्त अपिलासंर्भात आयोगाने दि. १७/११/२०२० रोजी जनमाहिती अधिकारी यांच्या विरुद्ध २५०००/- रुपये शास्तीची कार्यवाही का करण्यात येवू नये याचा लेखी खुलासा मागितला होता. दि. ०६/१०/२०२१ रोजी तत्कालीन जन माहिती अधिकारी तथा ग्रामसेवक श्री.एस.डी.गायकवाड यांचा खुलासा अमान्य करत, माहिती अधिकार अधिनियम, अन्वये रुपये ५०००/- शास्तीची कार्यवाही राज्य माहिती आयुक्त, खंडपीठ नाशिक यांनी केली आहे.
दि.२३/०४/२०१८ रोजीच्या माहिती अर्जान्वये दि.०१/०४/२०१५ ते दि.२३/०४/२०१८ या कालावधीत मौजे पिंप्राणी ग्रामपंचायतीमध्ये १४ वित्त आयोगाच्या निधीतून करण्यात येणाऱ्या कामासंदर्भात विविध मुद्यांवर माहिती अधिकार कार्यकर्ता राजेश्वर सामुद्रे यांनी माहिती मागितली होती. सदर माहिती अर्जाच्या अनुषंगाने राज्य माहिती आयोगाकडे दाखल झालेल्या उपरोक्त अपिलासंर्भात आयोगाने दि. १७/११/२०२० रोजी जनमाहिती अधिकारी यांच्या विरुद्ध २५०००/- रुपये शास्तीची कार्यवाही का करण्यात येवू नये याचा लेखी खुलासा मागितला होता. दि. ०६/१०/२०२१ रोजी तत्कालीन जन माहिती अधिकारी तथा ग्रामसेवक श्रीमती संगीता वसंत नाईक यांचा खुलासा अमान्य करत, माहिती अधिकार अधिनियम, अन्वये रुपये ५०००/- शास्तीची कार्यवाही राज्य माहिती आयुक्त, खंडपीठ नाशिक यांनी केली आहे.
मागील आठवड्यातच कळंबू, असलोद, मलोनी, अनरद येथील एकूण ५ ग्रामसेवक आणि आता २ ग्रामसेवक अशा एकूण ७ ग्रामसेवकांवर कारवाई होत असल्याने तालुक्यासह जिल्ह्याभरात चर्चा सुरु आहे.
Tags
news
