मतदारांच्या मदतीसाठी ‘व्होटर हेल्पलाइन ॲप’ : जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांची माहिती




धुळे, दि. 24 (जिमाका वृत्तसेवा) : धुळे जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी व्होटर हेल्पलाइन ॲप (Voter Helpline App) डाऊनलोड करुन www.nvsp.in या संकेतस्थळावरील उपलब्ध ऑनलाईन सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे. 
मा. भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर (Qualifying Date) आधारीत छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी मा. भारत निवडणूक आयोगाने वेळापत्रक निश्चित केले आहे. 1 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत.  1 जानेवारी 2022 रोजी ज्यांनी वयाची 18 वर्षे पूर्ण केली आहेत परंतु अद्याप मतदार म्हणून नोंदणी झालेली नाही, अशा वंचित नागरिकांनी आपल्या नावाची नोंदणी मतदार यादीमध्ये करण्यासाठी फॉर्म क्रमांक 6 भरावा. 
मतदार यादीतील नाव कमी करणे, हरकत नोंदविण्यासाठी फॉर्म क्रमांक सात भरावा.  ज्या मतदारांचे मतदार यादीमधील नाव, वय, जन्म दिनांक व पत्ता, नातेवाईकाचे नाव इत्यादी माहितीमध्ये दुरुस्ती किंवा बदल करावयाचा आहे, अशा मतदारांनी देखील दुरुस्तीचा फॉर्म क्रमांक 8 भरावा. ऑनलाईन स्वरुपात सादर करण्याची सुविधा Voter Helpline App वर उपलब्ध आहे. हे ॲप Google Play Store वरुन डाऊनलोड केल्यास त्यावर मतदार यादीतील नावांचा शोध घेणे, वरीलप्रमाणे नाव नोंदणी, दुरुस्ती, नाव कमी करण्याची सुविधा, तसेच e Epic डाऊनलोड करणे, आपले मतदान केंद्राची विस्तृत माहिती, निवडणूक विषयक चालू घडामोडी, निवडणूक निकाल व इतर विस्तृत माहिती उपलब्ध आहे. 
तसेच जागरूक मतदार www.nvsp.in या संकेतस्थळावर सुध्दा मतदान नोंदणी विषयक वरील अर्ज ऑनलाईन स्वरूपात करु शकतात. या संकेतस्थळावर मतदार नोंदणी विषयक, e Epic डाऊनलोड करणे, मतदार यादीत नावाचा शोध घेणे, मतदार यादी उपलब्धतेची सुविधा उपलब्ध आहे, असेही जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी म्हटले आहे.



Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने