धुळे, दि. 17 (जिमाका वृत्तसेवा) : राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त 21 सप्टेंबर 2021 रोजी धुळे जिल्ह्यातील 7 लाख 75 हजार 233 बालकांना जंतनाशक गोळीचा लाभ देण्यात येणार आहे. या गोळीचा संबंधित बालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा समन्वय समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, जिल्हा माता- बाल संगोपन अधिकारी डॉ. प्रसन्न कुलकर्णी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विक्रम वानखेडे यांनी केले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार देशात 68 टक्के बालकांमध्ये आढळणारा आतड्यांचा कृमी दोष हा मातीतून होणाऱ्या जंतांमुळे होतो. देशात 28 टक्के बालकांना कृमीदोष होण्याची शक्यता असते. त्यामागील प्रमुख कारण म्हणजे वैयक्तिक व परिसर स्वच्छतेचा अभाव असणे हे आहे. या कृमी दोषांचा संसर्ग दूषित मातीच्या संपर्कात आल्यामुळे होतो.
बालकांमध्ये होणारा दीर्घकालीन कृमी दोष हा व्यापक स्वरुपाचा असून मुलांना कमजोर करणारा आहे. कृमी दोष हा रक्ताक्षय आणि कुपोषणाचे कारण, तर आहेच तसेच बालकांची बौद्धिक व शारीरिक वाढ खुंटण्याचे कारण ठरते. देशात 6 ते 59 महिने या वयोगटात प्रत्येकी 10 बालकांमागे सात बालकांमध्ये रक्ताक्षय आढळतो. ग्रामीण भागात हे प्रमाण जास्तही असू शकते. तसेच 15ते 19 वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलींमध्ये व 30 टक्के किशोरवयीन मुलांमध्ये रक्ताक्षय आढळतो. देशात 5 वर्षाखालील सुमारे 50 टक्के बालकांची वाढ खुंटलेली आहे आणि साधारणत: 43 टक्के बालके कमी वजनाची आहेत. राष्ट्रीय जंतनाशकाचा उद्देश 1 ते 19 वर्षे वयोगटातील सर्व पूर्व शालेय वयोगटातील बालके व शालेय वयोगटातील विद्यार्थ्यांना (पटावर असलेली व पटावर नसलेली / शाळेत न जाणारी सर्व 19 वर्षापर्यंतची मुले व मुली) शाळा व अंगणवाडी केंद्र स्तरावर जंतनाशक गोळी देवून त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे हा आहे. जंतनाशक मोहिमेची अंमलबजावणी 21 व 28 सप्टेंबर 2021 रोजी होईल. या मोहिमेची ग्रामीण व शहरी भागात 41 प्राथमिक आरोग्य केंद्र, 232 उपकेंद्र, 2 उपजिल्हा रुग्णालय, महानगरपालिकेचे 13 दवाखाने, 2207 अंगणवाडी, 1905 शासकीय व खासगी शाळा या संस्थेमार्फत अंमलबजावणी केली जाणार आहे.
तालुकास्तरावर मोहिमेंतर्गत शाळेतील नोडल शिक्षकांना गटशिक्षण अधिकारी व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या मार्फत प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आशा, अंगणवाडी कार्यकर्ती, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आरोग्य पर्यवेक्षक व इतर सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनाही प्रशिक्षण देण्यात आले आहे. 21 सप्टेंबर 2021 रोजी जिल्ह्यातील 7 लाख 75 हजार 233 बालकांना सर्व शासकीय शाळा, शासकीय अनुदानीत शाळा, खासगी शाळा तसेच अंगणवाडी केंद्र, आश्रमशाळेत जेवणानंतर जंतनाशक गोळीचे लाभ देण्यात येणार आहेत. गोळी ही जेवण करुनच घ्यावयाची आहे. या कार्यक्रमामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाबरोबर शिक्षण विभाग, महिला व बालविकास विभागाचा सहभाग आहे. काही कारणास्तव राष्ट्रीय जंतनाशक दिनी गोळी दिली गेली नसेल, अशा उर्वरीत बालकांना 28 सप्टेंबर 2021 रोजी मॉप-अप दिनी जेवणानंतर ही गोळी देण्यात येईल. या गोळीचा बालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा समन्वय समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी श्री. शर्मा, सहअध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी, सदस्य सचिव तथा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नवले आदींनी केले आहे.
Tags
news

