भूपेशभाई पटेल यांच्या पुढाकाराने शिरपूर शहरात सीसीटीव्ही कॅमेरे, चोरट्यांवर असणार नजर





शिरपूर : शिरपूरच्या मुख्य बाजारपेठेसह महत्त्वाच्या ठिकाणी लवकरच मूक प्रहरी तैनात करण्यात येणार आहेत. परिसरात घडणार्‍या घटना, घडामोडी खडान्खडा टिपून त्यांचा संग्रह केला जाणार आहे. शहरातील चोरीसह विविध गुन्ह्यांची वाढती संख्या लक्षात घेवून उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी स्वखर्चाने शहर सुरक्षा निगराणीखाली आणण्यासाठी आखलेल्या सीसीटीव्ही प्रकल्पाची उभारणी प्राथमिक टप्प्यात असून लवकरच ही सेवा सुरु केली जाणार आहे.
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग, जळगाव आणि नंदुरबार जिल्हा व मध्यप्रदेशाचे सान्निध्य लाभलेल्या शिरपुरात येऊन गुन्हे केल्यानंतर फरार होणार्‍यांची संख्या मोठी आहे. गुन्हा करुन फरार व्हायचे, काही दिवसानंतर पुन्हा त्याच पद्धतीचे गुन्हे करायचे अशी कार्यपद्धती असलेल्या गुन्हेगारांमुळे नागरिक त्रासले आहेत. चेन स्नॅचिंग, दुचाकी चोरी, घरफोडी अशा गुन्ह्यांची संख्या सर्वाधिक आहे. अपवाद वगळता उघडकीस न आलेल्या गुन्ह्यांची संख्या अधिक आहे. त्यात शहराचा कॉलनी परिसर वेगाने विस्तारतो आहे. करवंद, निमझरी, वाघाडी, खर्दे, वरझडी, मांडळ आदि गावांना शहराच्या सीमा भिडत आहेत. नव्या वसाहतींचा हा विस्तार विकासाला जसा पूरक आहे तसा चोरट्यांनाही पोषक आहे. तुरळक वस्ती असलेल्या कॉलन्यांमधून चोरीचे गुन्हे वाढले आहेत.
चोर्‍यांचे प्रमाण लक्षात घेवून काही वर्षांपासून पालिकेच्या माध्यमातून शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी शासनाकडे विविध योजनेंतर्गत प्रस्ताव पाठविण्यात आले. मात्र शासनातर्फे त्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले गेले नाही. शासनाचा वेळकाढूपणा आणि शहराची गरज लक्षात घेवून अखेर सीसीटीव्ही उभारणीचा प्रकल्प स्वखर्चाने राबवण्याचा निर्णय भूपेशभाई पटेल यांनी घेतला. त्यासाठी नुकताच पोलिसांना योग्य जागांची निवड करण्यासाठी प्रस्तावही त्यांनी दिला आहे. पालिकेतर्फे सीसीटीव्ही लावण्यासाठी सज्जता केली जात आहे.

अशी असेल यंत्रणा : सीसीटीव्ही यंत्रणेचे कॅमेरे शहरातील उंच भागावर व चौफेर वळवता येतील अशा ठिकाणी बसवण्यात येणार आहे. इंटरनेटद्वारे या अत्याधुनिक कॅमेर्‍यांची रेकॉर्डिंग प्रचंड क्षमतेच्या रेकॉर्डरवर नोंदवली जाणार आहे. या रेकॉर्डरसाठी स्वतंत्र क़क्ष असणार आहे. प्रत्येक कॅमेरा एचडी क्वालिटीचा असणार असून त्याची दृश्य टिपण्याची क्षमताही मोठी आहे. दूर अंतरावरील तसेच रात्रीच्या वेळेतील दृश्येही या कॅमेर्‍यांमध्ये स्पष्ट रेकॉर्ड करणे शक्य आहे. अत्यंत महागड्या व अत्याधुनिक यंत्रणेचा खर्च भूपेशभाई पटेल वहन करणार आहेत.


भूपेशभाई पटेल, उपनगराध्यक्ष : कष्टाने जमवलेली संपत्ती चोरीसारख्या घटनांत नाहीशी होणे ही प्रत्येकासाठी दु:खदायक बाब ठरते. अत्याधुनिक कॅमेर्‍यांद्वारे चोरीसारख्या कृत्यांवर काहीशी जरब बसवता येते. पण नागरिकांनीही आपापल्या घरावर पुरेसे कॅमेरे बसवल्यास अधिक उपयोग होईल. लाखो रुपयांचे घर आणि दाराला 50 रुपयांचे कुलूप असे करणे योग्य नाही. घराची सर्व दारे पुरेशी मजबूत असावीत. शक्यतोवर लाकडी दाराव्यतिरिक्त लोखंडी दारही असावे. रात्री पुरेसा उजेड राहील याची काळजी घ्यावी. 

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने