प्रतिनिधी दत्ता पारेकर
पुणे:बाळू मामांचे वंशज म्हणवणारे मनोहरमामा उर्फ मनोहर भोसले यांच्याविरोधात बारामती तालुका पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे.
बारामतीतील महेश आटोळे यांनी मनोहर मामा यांच्याविरोधात बारामती तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, मनोहर भोसले यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
बारामती तालुक्यातील महेश आटोळे यांनी मनोहर मामा उर्फ मनोहर भोसले यांनी अंधश्रद्धेतून फसवणूक केल्याची तक्रार बारामती तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे.
आटोळे यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे की, माझ्याकडून त्यांनी जवळपास 40 लाख रुपयाचा रो हाऊस घेतला होता. मात्र माझी कुठलीच कामे मार्गी लागली नाहीत. त्यामुळे मी दिलेला रो हाऊस मनोहर मामा यांना परत मागितला. मात्र रो हाऊस मी तुला देणार नाही, कारण तुझ्या तंत्रविद्या करण्यात माझे लाखो रुपये खर्च झाले आहेत. तू मला ते पैसे परत कर त्यावेळेसच मी रो हाऊस परत करेन, असं मनोहर मामा यांनी सांगितले. यामुळे आटोळे यांनी फसवणूक झाल्याची तक्रार बारामती तालुका पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.
