शिरपूर : तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी नियमित विदयुत पुरवठा करण्यात यावा अन्यथा सोमवारी विज कंपनी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा शिरपूर भाजपातर्फे देण्यात आला आहे.
शिरपूर महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीचे अधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून, कृषी पंपांना रोटेशन प्रमाणे दिवसा ८ तास व रात्री १० तास विदयुत पुरवठा केला जातो. तसे वेळापत्रक विदयुत मंडळाकडून शेतकऱ्यांना दिले जाते. रोहीणी नक्षत्रात पाऊस पडल्यामुळे कापूस व इतर पिकांची लागवड झाली असून ऊस व फळ पिके सुध्दा उभे आहेत. शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना नियमितपणे विज न मिळता ४/५ तास मिळते. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट व वारंवार विदयुत प्रवाह खंडीत झाल्याने इलेक्ट्रीक मोटर, स्टार्टर, केबल इ. इलेक्ट्रीक साधने जळाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना वीज कमी मिळत असून देखील शिरपूर तालुक्यातील विद्युत सबस्टेशन वरून चोपडा तालुक्याला विज पुरवठा केला जातो. यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात आर्थिक नुकसान होत असून याची आपण गंभीर दखल घ्यावी, शेतकऱ्यांच्या मालमत्तेचे नुकसान झाल्यास विदयुत मंडळावर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी नियमित विज पुरवठा व्हावा अन्यथा शेतकरी हे बाहेरील तालुक्यात जाणारी वीज स्वतः खंडीत करून विज वितरण कंपनी कार्यालयावर आमदार काशिराम पावरा, भा.ज.प. प्रदेश सदस्य बबनराव चौधरी यांच्या नेतृत्वाखाली सोमवार दि. ७ जून २०२१ रोजी सकाळी ११ वाजेला मोर्चा काढण्यात येईल असा इशारा शिरपूर भा.ज.पा. तालुकाध्यक्ष किशोर माळी, शहराध्यक्ष हेमंत पाटील, जिल्हा उपाध्यक्ष के. डी. पाटील, माजी जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांनी निवेदनातून दिला आहे.
शेतकऱ्यांचे जिवीत व आर्थिक काही नुकसान झाल्यास आपण जबाबदार राहाल व आपल्या चुकीमुळे जे कृषी पंपांना वीज पुरवठ्याचे संकट उभे राहिले आहे, त्याबद्दल आपणावर गुन्हा का दाखल होवू नये व आपण कर्तव्यात कसूर करून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले यास आपणास जबाबदार का धरण्यात येवू नये असे निवेदनात म्हटले असून विज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी भाजपा पदाधिकारी व तालुक्यातील शेतकरी बांधव यांच्या मागणीच त्वरीत दखल घ्यावी असे कळविण्यात आले असून सदर निवेदनाची प्रत तहसीलदार शिरपूर, पोलिस निरीक्षक शिरपूर, सहाय्यक पोलिस निरीक्षक थाळनेर यांना पाठविण्यात आली आहे.
Tags
news
